Amruta Deshmukh Prasad Jawade : मराठी सिनेसृष्टीत एकामागोमाग एक कलाकार लग्नबंधनात अडकले. या जोडप्यांच्या लग्नाची धामधूम सर्वत्र पसरली होती. दरम्यान अमृता देशमुख व प्रसाद जवादे यांच्या शाही विवाहसोहळ्याने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. १८ सप्टेंबर २०२३ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली. मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी अमृता-प्रसादच्या लग्नाला हजेरी लावली होती. अमृता-प्रसादच्या लग्नातील पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय त्यांच्या शाही लग्नसोहळ्याने सोशल मीडियावरही धुमाकूळ घातला.
लग्नबंधनात अडकल्यानंतर अमृता व प्रसाद त्यांच्या संसाराला लागले आहेत. संसार सांभाळत ही जोडी कामालाही लागली आहे. याशिवाय लग्नानंतर ही जोडी सणवार साजरी करताना दिसत आहेत. नव्या वर्षातील मराठी सणांना सुरुवात झाली असून या नव्या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत. कलाकार मंडळींनी चाहत्यांना सोशल मीडियाद्वारे मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळाल्या.
अशातच काही दिवसांपूर्वी लग्नबंधनात अडकलेली नवविवाहित जोडी म्हणजे प्रसाद-अमृता. या जोडीवर प्रेक्षकांनीही भरभरून प्रेम केलेलं पाहायला मिळालं. अमृता-प्रसादच्या पहिल्या मकरसंक्रांती निमित्त दोघांचा खास लूक समोर आला आहे. मकरसंक्रातीचे हे खास फोटो अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी पोस्ट करत केले आहेत. शिवाय दोघांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे, यांत त्यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
अमृता व प्रसादचा मकरसंक्रांती स्पेशल पारंपरिक लूकने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी अमृताने सुंदर अशी काळ्या रंगाची साडी परिधान करत त्यावर हलव्याचे दागिने घातलेले पाहायला मिळत आहे. यांत अमृताचं सौंदर्य अधिकच खुलून आलेलं दिसून येत आहे. तसेच अभिनेत्रींच्या हटके डिझाइन असलेल्या मंगळसूत्रानेही चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तर प्रसादने काळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे त्यावर पतंगाचं नक्षीकाम पाहायला मिळतं आहे. हे दोघेही या पारंपरिक अंदाजात गोड दिसत आहेत. लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला सण असल्याने त्यांनी ही मकरसंक्रांत पारंपरिक पद्धतीने साजरी केलेली पाहायला मिळत आहे.