रामजन्मभूमी अयोध्येतील राम मंदिर उभारणीचे काम आता पूर्ण झाले असून लवकरच या मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. देशातील प्रत्येक जण राम मंदिराच्या उद्घाटन समारंभाची आतुरतेने वाट पाहत आहेत. येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या भव्य सोहळ्यासाठी देशभरातून लाखो लोक अयोध्येत दाखल होणार आहे. यात सर्वसामान्यांप्रमाणेच बॉलिवूड, साऊथ आणि मराठी कलाकारांनाही या समारंभाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. (Ayushmann Khurrana Invited For Ram Mandi Pran Pratishtha)
अनेक बॉलिवूड कलाकारांनाही राम मंदिर उद्घाटनाचं निमंत्रण देण्यात आलं आहे अक्षय कुमार, कंगना रणौत, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ, हरिहरन, रजनीकांत, अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रणदीप हुडा यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना अयोध्येतील राम मंदिर ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्यासाठी आमंत्रण मिळाले आहे. अशातच आता यात आणखी एका अभिनेत्याची भर पडली आहे आणि तो अभिनेता म्हणजे आयुष्मान खुराना.
२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराच्या ‘प्राण प्रतिष्ठा’ समारंभास उपस्थित राहण्यासाठी आयुष्मान खुरानाला आमंत्रित करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबई महानगर संपर्क प्रमुख, सीए अजित पेंडसे यांनी वैयक्तिकरित्या आयुष्मानला या समारंभाचे निमंत्रण दिले आहे. त्यामुळे आयुष्मानच्या चाहत्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे.
दरम्यान, अयोध्येतील राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी वैदिक विधी मुख्य सोहळ्याच्या एक आठवडा आधी म्हणजेच १६ जानेवारीपासून सुरू होणार आहेत. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी राम मंदिर २३ जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी दर्शनासाठी खुले होणार असल्याची माहिती दिली आहे.