Shashank Ketkar Video : फिल्मसिटी विभागातील कचरा व्यवस्थापनेवर अभिनेता शशांक केतकरने थेट एक व्हिडीओ पोस्ट केला होता. रस्त्याच्या बाजूला पडलेल्या कचऱ्यावरुन त्याने बृहन्मुंबई महानगर पालिकेला टोला लगावला. इतकंच नाही तर हा व्हिडीओ शेअर करत त्याने जनतेलाही निर्लज्ज म्हटले. शशांकने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ बनवून पोस्ट केले आहेत. तर अभिनेत्याने बनवलेले हे व्हिडीओ पाहून प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले आहेत. यानंतर आता अभिनेत्याने पुन्हा एकदा कचऱ्यावरुन शेअर केलेल्या व्हिडीओनंतर प्रशासनाने याची दखल घेतलेली पाहायला मिळत आहे. याची आणखी एक पोस्ट त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे.
अभिनेत्याने पुन्हा एकदा फिल्मसिटी येथील कचऱ्यामुळे घाणेरड्या झालेल्या ठिकाणाचा थेट व्हिडीओ शेअर करत त्याने एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यानंतर थेट BMC ने या भागाची दखल घेत हा परिसर स्वच्छ केला असल्याचं समोर आलं आहे. व्हिडीओ शेअर करत शशांकने असं म्हटलं की, “फिल्मसिटीचा प्रवेश कधीच मला दुखावत नाही. कचरा उचलणाऱ्या या मातेला आणि उकिरड्यावर असणाऱ्या या राजमातेला वंदन करुन फिल्मसिटीच्या थोडं आत जाऊया आणि बघूया आणखी थोडा कचरा. प्रत्येक भागात कचऱ्याच्या पेट्या आहेत, पण इतकं करुन मोकळे होऊ नका. आपली लोकसंख्या खूप आहे त्यामुळे कचरा खूप होणार आहे. त्यामुळे खूप घाणेरडी ठिकाणं असणार आहे आणि त्या ठिकाणी अशी दोन-चार तुटलेले डबे ठेवण्यापेक्षा जितकी लोकसंख्या, जितका कचरा, जितकी ठिकाणं त्या ठिकाणी कचरा गोळा करायला सामग्री ठेवा”.
यानंतर थेट BMC ने पोस्ट शेअर करत शशांकला ही पोस्ट टॅग केली आहे. यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं आहे की, “सदर व्हिडीओमध्ये चित्रनगरीच्या आतील आणि बाहेरील अशी दोन्ही ठिकाणे दर्शवली आहेत. चित्रनगरी हद्दीच्या आतमध्ये चित्रनगरीने नियुक्त केलेल्या कंत्राटराकडून स्वच्छता करण्यात येते. तर बाहेरील परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छता केली जाते. बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता केल्यानंतरची छायाचित्रे बरोबर दर्शवली आहेत. संपूर्ण चित्रनगरी परिसरात कायम स्वच्छता राखली जावी, यासाठी दोन्ही प्रशासनामध्ये समन्वय राखण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर बैठक घेऊन कार्यवाही निश्चित केली जाईल”. शशांकने ही पोस्ट स्टोरीला शेअर करत, “मी प्रत्येक कलाकाराला सांगेन की जिथे कचरा दिसेल ते शूट करुन BMC च्या लक्षात आणून द्या”, असं म्हटलं आहे.

शशांकने व्हिडीओ शेअर करत त्याखाली कॅप्शन देत, “मला कल्पना आहे की, हे एकच ठिकाण नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशी हजारो ठिकाणं आहेत जिथे कचरा जमलेला असतो. बदलाची सुरवात ही छोट्या छोट्या गोष्टींमधूनच होत असते. जर BMC आणि कचरा टाकणारी जनता निर्लज्ज आहे तर मग मलाही निर्लज्जा सारखं हे पुन्हा पुन्हा निदर्शनास आणून द्यावं लागणार. मी व्हिडीओ बघणाऱ्या जनतेलाही हेच सांगेन, सहन करु नका. कचरा दिसेल तिथे व्हिडीओ शूट करुन तुमच्या महानगरपालिकेला टॅग करा. निदर्शनास आणून द्या. माझं मत वाया गेलं नसेल, अजूनही देश सुधारेल अशी आशा करतो. सगळे मिळून प्रयत्न करुया. स्वच्छ देश घडवूया”, असंही त्याने म्हटलं आहे.