Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत सध्या रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. मालिकेत पारूचा खडतर प्रवास पाहायला मिळत असून तिच्या या प्रवासाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, पारू व आदित्य यांच्यात दुरावा आल्याचंही पाहायला मिळत आहे. ऍड शूटदरम्यान आदित्य व पारू यांचं लग्न झालेलं असतं, आणि एकीकडे पारूने हे लग्न खरं मानलेलं असतं. त्यामुळे पारू तिच्या गळ्यातून आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र काढत नाही. इतकंच नाही तर पारूने जर गळ्यातून मंगळसूत्र काढलं तर त्यावेळी आदित्यच्या जीवाला धोका निर्माण होतो. पारूने हे गुपित फक्त सावित्रीला सांगितलेलं असतं त्यामुळे सावित्रीचा पारूला पाठिंबा असलेला पाहायला मिळत आहे. सावित्री पारूला वेळोवेळी मदत करताना दिसत आहे.
किर्लोस्कर कुटुंबात काही दिवसांपूर्वी अनुष्काची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे घरातील सदस्यांची समीकरणे बदलताना पाहायला मिळत आहेत. अहिल्यादेवी किर्लोस्करने अनुष्काचा सून म्हणून स्वीकार केला आहे. यामुळे आदित्यनेही अनुष्काचा बायको म्हणून स्वीकार केला आहे. त्यामुळे पारू नाराज असते. ती या सगळ्याचा स्वतःला त्रास करुन घेताना दिसते आणि अखेर या सगळ्या गोष्टी नशिबावर सोडते. तर अनुष्का पारूला सगळ्यांपासून दूर करण्याच्या प्रयत्नांत असते. आदित्य व पारू यांच्या मैत्रीतही ती फूट पडताना दिसतेय.
अशातच मालिकेचा एक नवा प्रोमो समोर आला आहे. समोर आलेला हा प्रोमो मार्गशीर्ष गुरुवार निमित्त खास आहे. या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, मार्गशीर्ष मधील गुरुवार निमित्त किर्लोस्करांच्या सूनेने ही पूजा करायची असते. सावित्री पारूला सांगते की, मार्गशीर्ष महिन्याच्या दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा केली जाते. घरची सून ही पूजा करते. तुलापण ही पूजा करावी लागेल”. प्रोमध्ये अनुष्का पूजा करताना दिसत आहे. तर सावित्रीच्या म्हणण्यानुसार पारू किर्लोस्करांच्या किचनमध्ये पूजा करते, पूजा मांडताना तिथे श्रीकांत येतो.
आता पारूच्या पूजा मांडण्यामागचं सत्य श्रीकांतसमोर येईल का हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे. समोर आलेला हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. या प्रोमोवर अनेक नेटकरी कमेंट करत पारूची बाजू घेताना दिसत आहेत. “सत्य समोर यावं आणि श्रीकांत ने सगळं समजून घेऊन पारूच्या बाजूने उभ राहावं”, असं म्हटलं आहे.