‘आभाळामाया’, ‘जुळून येती रेशीमगाठी’ यांसारख्या अनेक लोकप्रिय मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं अभिनेत्री म्हणजे सुकन्या मोने. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकं यांतून काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटातील भूमिकेमुळे त्यादेखील चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत त्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. सुकन्या व संजय यांचं नातं अगदीच खास आहे. दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे. अशातच सुकन्या यांनी त्यांच्या लग्नाचा एक खास किस्सा सांगितला आहे.
‘अमृता फिल्मस्’ला दिलेल्या मुलाखतीत सुकन्या यांना त्यांच्या व संजय मोने यांच्या नात्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा त्या म्हणाल्या, “माझं आणि संजयचं जेव्हा लग्न झालं तेव्हा इंडस्ट्रीमधल्या लोकांना असं वाटलं की, फार फार तर एक महिनाच यांचं लग्न टिकेल. कारण तो आईचे गाउन घालून फिरायचा. ओढणी घ्यायचा. कधी कानातले घालायचा. त्याच्या मैत्रिणीही अशा होत्या की, त्याला कानातले, ओढणी आणून द्यायच्या”.
“पण तेव्हा आमच्यामध्ये काहीच प्रेम वगैरे नव्हतं. मी त्याला शिवाजीपार्कमध्ये बघायचे. आम्ही जेव्हा ‘फुलराणी’मध्ये काम करत होतो तेव्हा तो माझ्या डोळ्यांमध्ये नव्हे तर कपाळाकडे बघून बोलायचा. तेव्हा मी म्हणायचे अहो मोने असं का करत आहात?. असं बोलल्यावर तो उत्तर द्यायचा की, तुमचं काम बरोबर होत आहे ना तर तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या. एकदा शिवाजी पार्कमध्ये माझ्या वडिलांना त्याचे वडील म्हणाले तुम्ही मी संजय मोनेंचा बाप, तुम्ही सुकन्याचे वडील ना… माझ्या मुलाला तुमच्या मुलीशी लग्न करायचं आहे. माझे बाबा घरी आले आणि मला विचारलं की, तू संजय मोनेंशी लग्न करणार आहेस?. तेव्हा मी बाबांना म्हटले त्यांनी मला लग्नासाठी विचारलं आहे, पण मी अजून काहीच विचार केला नाही”.
“संजयने मला रात्री दोन वाजता घराच्या खाली येऊन लग्नाची मागणी घातली होती. जेव्हा मी माझ्या आईला सांगितलं तेव्हा लग्नाला होकार द्यायला तिने चार महिने लावले. संजयचंही ठरलं होतं की, जोपर्यंत तुझे आई-बाबा होकार देत नाहीत तोपर्यंत आपण लग्न करायचं नाही. माझ्या सासूबाईंना माझ्या आईला फोन करुन आमच्या लग्नाबाबत विचारलं. तेव्हा माझ्या आई म्हणाली, तुम्हाला मान्य आहे का ती सून म्हणून तुमच्या घरी आलेली. माझ्या सासूबाई म्हणाल्या हो आम्हाला सुकन्या आवडते. तेव्हाच माझ्या आईने होकार कळवला. आता लग्नाला २६ वर्ष पूर्ण झाली.” तर अशाप्रकारे गेली २६ वर्ष सुकन्या व संजय अगदी सुखाने संसार करत आहेत.