‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत रंजक वळण आलेलं पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवींचा जीव वाचवून पारूने स्वतःचा जीव धोक्यात घातला आहे. पारूला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पारूला कमीत कमी सहा तासात बॉम्बे ब्लड उपलब्ध करुन देण्यास डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि रक्त नाही मिळालं तर पेशंट कोमामध्ये जाऊ शकतो असंही सांगतात. प्रीतम, आदित्य पारूचा जीव वाचविण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात. जवळच्या सर्व ब्लड बँकमध्ये ते चौकशी करतात पण हा रक्तगट त्यांना कुठेही सापडत नाही. (Paaru Serial promo Netizens Comment)
तेवढ्यात तिथे आदित्यचे बाबा येतात. त्यांना या रक्तगटाविषयी कळताच ते हा रक्तगट अहिल्याचा असल्याचा सांगतात. पारूचा जीव वाचविण्यासाठी अहिल्याला इथे घेऊन यावं लागेल असं म्हणून ते अहिल्याला आणायला घरी जातात. तोवर दामिनीने दिशाचे कान भरलेले असतात. अहिल्यादेवी पारुपर्यंत पोहोचू नये म्हणून झोपेच्या गोळ्या दुधात मिक्स करुन ती अहिल्यादेवींना देते. तेव्हा अहिल्यादेवी गाढ झोपतात. काही केल्या त्या उठत नाहीत. आता पारूचा जीव वाचवायला अहिल्यादेवी हॉस्पिटलला पोहोचणार का?, हे मालिकेच्या येणाऱ्या भागात पाहायला मिळणार आहे.
मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या या प्रोमोवरील नेटकऱ्यांच्या कमेंटने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मालिकेत उच्चारण्यात आलेल्या बॉम्बे ब्लड ग्रुप नक्की काय आहे?, हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. दरम्यान या पोस्टवर अनेकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. एका नेटकऱ्याने कमेंट करत, “Bombay blood group काय असतं? A positive , B Positive , O positive ब्लड ग्रुप बद्दल ऐकलं होतं”, तर आणखी एकाने, “बॉम्बे ब्लड हा कोणता नवा रक्तगट आहे”, असा प्रश्न विचारत कमेंट केली आहे. यावर एका नेटकऱ्याने उत्तर देत, “बॉम्बे रक्तगट हा एक दुर्मिळ रक्त प्रकार आहे. १९५२ मध्ये डॉ. वाय. एम. भेंडे यांनी हा रक्ताचा फेनोटाइप प्रथम मुंबईत शोधला होता. तो बहुतांश भारतीय उपखंड व इराणमध्ये आढळतो”, असं म्हटलं.
बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे नक्की काय?
बॉम्बे ब्लड ग्रुपला Oh म्हणून देखील ओळखले जाते.या ब्लड ग्रुपचा शोध १९५२ साली डॉ. वाय. एम. भेंडे नावाच्या डॉक्टरांनी पूर्वीच्या मुंबईमध्ये अर्थात बॉम्बेमध्ये लावला होता. म्हणून या रक्तगटाला बॉम्बे हे नाव पडले. ओ निगेटिव्ह पेक्षाही हा दुर्मिळ ब्लड ग्रुप आहे. हा ब्लड ग्रुप जगाच्या एकूण लोकसंख्येच्या केवळ ०.०००४% लोकसंख्येमध्येच आढळतो. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर दर दहा लाख लोकांच्या मागे केवळ जण या ब्लड ग्रुपचा सापडेल. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीचे रक्त इतर ब्लड ग्रुपमधील व्यक्तीला चालू शकते, परंतु इतरांचे रक्त बॉम्बे ब्लड टाईप असणान्या व्यक्तीला चालत नाही. या व्यक्तींना केवळ बॉम्बे ब्लड टाईप असणाऱ्या व्यक्तीच रक्त देऊ शकतात.