नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी निधन झालं. अतुल परचुरे गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल होते. त्यांची तब्येत बिघडली होती. वर्षभरापूर्वीच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर मात करत ते बरे झाले होते. नव्या जोमाने कामालाही लागले होते. अशातच वयाच्या ५७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज मंगळवार दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार उपस्थित होते आणि लाडक्या मित्राला निरोप देताना सर्वचजण भावुक झाले. याचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Amruta Deshmukh Shared Atul Parchure Memory)
अतुल यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांसह मराठी मनोरंजन विश्वावरही शोककळा पसरली आहे. अशातच अभिनेत्री अमृता देशमुखची एक पोस्ट व्हायरल होत आहे. अमृताने अतुल यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत एक जुनी आठवणही सांगितली आहे. या पोस्टखाली अमृताने असं म्हटलं आहे की, “अतुल परचुरे सर..माझी पहिलीच भेट झाली ती “नियम व अटी लागू” बघायला ते झी नाट्य गौरव चे परिक्षक म्हणून आले होते तेव्हा…मध्यंतरात त्यांनी येऊन सांगितलं की “छान काम करतेयस.. फार छान”.
यापुढे तिने म्हटलं की, “प्रोत्साहनासाठी ते मला असं म्हटले असावे असं मला वाटलं. त्यानंतर झीचं अवॉर्ड मला मिळालं आणि मला आनंदाने धक्काच बसला. निघताना माझी पुन्हा त्यांच्याशी भेट झाली आणि ते म्हणाले “तूला एवढा धक्का का बसला आहे. आम्हाला खरंच तुझं काम आवडलं होतं”. खरं सांगते, त्यांच्यासारख्या अभिनेत्याकडून मला हे ऐकायला मिळालं आणि मग विश्वास बसला की ठीक आहे, ही ट्रॉफी खरंच माझी आहे.”
यापुढे अमृताने असं म्हटलं आहे की, “माझी त्यांच्याबरोबरची आठवण ही शेवटची आठवण ठरेल असं अजिबात वाटलं नव्हतं. ही केवळ आठवण नाही तर माझ्यासाठी एक खजिना आहे. अतुल सर तुमची कायम आठवण येईल”. दरम्यान, या पोस्टखाली अनेकांनी कमेंट्स करत अतुल यांना आदरांजली वाहिली आहे.