मराठी सिनेसृष्टीची सर्वगुसंपन्न अभिनेत्री म्हणून स्पृहा जोशीला ओळखले जाते. ती एक उत्तम अभिनेत्री आहेच. पण त्याचबरोबर ती एक उत्तम कवयित्री, गायिका, लेखिका आणि सूत्रसंचालिकादेखील आहे. टीव्हीचा छोटी स्क्रीन असो वा चित्रपटाची मोठी स्क्रीन… स्पृहाने आपल्या अभिनयाने कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अशातच नुकताच स्पृहाचा वाढदिवस झाला. मराठी कलाविश्वातून तिला भरभरुन शुभेच्छा मिळाल्या. अशातच आता नुकतंच तिने फोटो पोस्ट करत सर्वांचे आभार मानले. त्याचबरोबर तिने आई-वडील रुग्णालयात असल्याची माहितीही दिली आहे. त्यांना नक्की काय झालं आहे? हे तिने सांगितलं नसलं तरी त्यांची तब्येत आता सुधारत असल्याचे तिने या पोस्टमधून म्हटलं आहे. (Spruha Joshi Parents)
स्पृहाने इन्स्टाग्रामवर तिचा स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे, या पोस्टमध्ये तिने असं म्हटलं आहे की, “१३ ऑक्टोबरला झालेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा अजून येत आहेत. आई-बाबांची तब्येत सुधारत आहे. ज्यूपिटर हॉस्पिटलमधील सर्वजण त्यांची आणि पेशंटच्या नातेवाईकांची प्रेमाने काळजी घेत आहेत. सगळे स्नेही, आप्तेष्ट, मित्र ‘काहीही लागलं तरी सांग’ म्हणून दिलासा देत आहेत. इतकी माणसं जोडलेली असणं ही त्या दोघांची पुण्याई”.
यापुढे तिने असं म्हटलं आहे की, “आपल्यावर प्रेम करणारी इतकी माणसं आहेत, ही भावना फार मन भरून टाकणारी आहे. मी तुम्हा सगळ्यांची ऋणी आहे. प्रत्येकाला उत्तर देणं जमलं नाही. रागावू नका. लोभ आहेच, तो वाढत राहो”. या पोस्टखाली स्पृहाच्या अनेक चाहत्यांनी तिच्या आई-वडिलांची तब्येत लवकर बरी व्हावी अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. “सर्व काही ठीक होईल”, “श्री स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी आहेत”, “दोघं ही छान ठणठणीत होतील” अशा अनेक कमेंट्स करत चाहत्यांनी स्पृहाला खंबीर राहण्यास सांगितले आहे.
दरम्यान, स्पृहाबद्दल सांगायचं झालं, तर ‘उंच माझा झोका’, ‘अग्निहोत्र’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिकांमुळे स्पृहा जोशी घराघरांत लोकप्रिय झाली. चित्रपट, नाटक, मालिका, वेब सीरिज अशा चारही माध्यमांमध्ये तिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनयाप्रमाणेच स्पृहा तिच्या कवितांमुळे देखील चर्चेत असते.