Adah Sharma : ‘द केरळ स्टोरी’ अभिनेत्री अदा शर्मा काही महिन्यांपूर्वी दिवंगत सुशांत सिंग राजपूतच्या मुंबईतील घरी शिफ्ट झाली होती. काही वर्षांपूर्वी याच घरात सुशांत सिंगचा मृत्यू झाला होता. सुशांतचे घर चार वर्षे रिकामे राहिले आणि यावर्षी अदा शर्मा येथे शिफ्ट झाली. दिवंगत अभिनेत्याच्या घरी शिफ्ट झाल्यामुळे अभिनेत्रीलाही ट्रोल व्हावे लागले होते. आता अदाने एका मुलाखतीत याबद्दल केलेलं भाष्य चर्चेत आलं आहे. दिवंगत सुशांत सिंह राजपूतच्या घरी शिफ्ट झाल्यामुळे अदा शर्माला टीकेला सामोरे जावे लागले होते. खरं तर, नेटकऱ्यांनी तिच्यावर प्रसिद्धीसाठी सुशांतच्या नावाचा वापर केल्याचा आरोप केला होता.
आता अदाने ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अदा म्हणाली, “एक अभिनेता म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून तुम्ही सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. आपल्या सर्वांना आयुष्यात खूप काही करायचे आहे. तसेच, हा एक स्वतंत्र देश आहे आणि प्रत्येकाला त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे, जर एखादी गोष्ट करावीशी वाटत असेल तर प्रत्येकाने ती केली पाहिजे आणि ती करत राहिली पाहिजे”. अदा पुढे म्हणाली, “मी एक चांगली व्यक्ती आहे हे कोणालाही सांगण्यासाठी किंवा माझ्या कृतीची कारणे सांगण्यासाठी मी येथे नाही. मला जे करायचे होते ते मी केले, आणि मी स्वतःला ओळखते. मी स्वतःला बदलणार नाही, मी खरोखरच स्थायिक झाले आहे आणि मला हे ठिकाण आवडते”.
अदा शर्मा जूनपासून मुंबईतील वांद्रे येथील मोंट ब्लँक या समुद्राभिमुख इमारतीत सुशांत सिंग राजपूतच्या घरात भाड्याने राहत आहे. फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, सुशांतच्या घरात तिला भीती वाटते का? तिला कधी सुशांतची उपस्थिती जाणवली का? या घरात तिला कधी भीतीदायक गोष्टींचा भास झाला आहे का? या प्रश्नांची उत्तरे देताना अभिनेत्री म्हणाली, “मला हे समजले आहे की, लोक मला बहुतेक त्यांच्या भीतीपोटी प्रश्न विचारतात. भीतीपोटी असे प्रश्न विचारणे योग्य नाही असे मला वाटते”.
अदा पुढे म्हणाली, “सुशांत सिंग राजपूतला त्याच्या चमकदार कामासाठी आणि कामगिरीसाठी लक्षात ठेवले पाहिजे. तो एक अतिशय प्रतिभावान अभिनेता होता”. अदाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर अदा नुकतीच ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ मध्ये दिसली होती. सुदीप्तो सेन दिग्दर्शित आणि विपुल अमृतलाल शाह निर्मित, हा चित्रपट १५ मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. ही अभिनेत्री लवकरच ‘रीता सन्याल’ या नाटक मालिकेत दिसणार आहे. यामध्ये ती वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे.