मराठी मालिकांमधून नावारुपाला आलेला चेहरा म्हणजे विकास पाटील. ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वातही विकास सहभागी झाला होता. या शोमुळे त्याच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच भर पडली. त्याने विविध भूमिका साकारत कलाक्षेत्रामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकतीच विकासने ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत स्वामीसुत ही भूमिका साकारली होती.
विकास हा सोशल मीडिया अकाऊंटवरुन कमालीचा ऍक्टिव्ह असतो. तो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याच्या कामाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही कायम शेअर करत असतो. अशातच विकासने त्याच्या गावाकडचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्याकडे साऱ्यांच्या नजरा वळल्या आहेत. (Actor Vikas Patil Shares Glimps Of His House And Farm)
पाहा विकास पाटीलच्या गावच्या शेताची झलक (Actor Vikas Patil)
काही महिन्यांपुर्वीच विकासने त्याच्या कोल्हापुरातील नवीन घराचे फोटो सोशल मीडियावरून शेअर केले होते. सोबतच त्याने घराच्या वास्तूशांतीचे फोटोही इंस्टाग्रामवर शेअर केले होते. यानंतर आता त्याने गावच्या घराचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये विकासचं गावाकडचं घर आणि आवारातील शेत पाहायला मिळतंय. नवीन घराच्या गच्चीवरून विकासने हा व्हिडिओ शुट केला असून त्यात विकासने घराच्या आजुबाजूला पसरलेलं हिरवंगार शेत पाहायला मिळतंय. या व्हिडिओमध्ये विकासचे बाबा शेतात काम करताना दिसत असून गच्चीवर विकासची आई कपडे वाळवताना दिसत आहे.
‘खो गये हम कहा’ असं म्हणत विकासने इंस्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. “माझं गाव… माझं शेत… माझं घर… जगात भारी कोल्हापुरी आई-बाबा त्यांच्या कामात गर्क आणि मी माझ्या, मीसिंग यु बायको” असं विकासने या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओतून विकास गावातील निवांतपणा आणि आनंद अनुभवताना दिसत आहे.
विकासने शेअर केलेल्या व्हिडिओचं नेटकऱ्यांकडुन कौतुक होत असून विकासच्या शेताचं आणि घराचं त्याच्या चाहत्यांकडून कौतुक होत आहे. विकासचा साधेपणा त्याच्या चाहत्यांना भावला असून चाहत्यांनी विकासच्या या व्हिडिओवर अनेक कमेंट केल्या आहेत. तसेच एका चाहत्याने तर पिकवत असलेल्या शेतातील पिकाबद्दल विचारणा केली आहे.
आता विकास कोणत्या नव्या मालिकेतून, नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.