मराठी नाटक, मालिका व चित्रपट अशा तिन्ही मध्यमांत काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना अचंबित करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. केवळ अभिनयच नव्हे, तर आपल्या कवितांच्या सादरीकरणातूनही तो प्रेक्षकांची मनं जिंकत आला आहे. तो एक उत्तम लेखक, कवी व संवादकार असल्यामुळे त्याचे लिखाण व बोलणं ऐकणे हेदेखील त्याच्या चाहत्यांना भलतेच आवडत असते. संकर्षण हा त्याच्या अभिनयामुळे जितका चर्चेत असतो, तितकाच तो त्याच्या सोशल मीडियाद्वारेदेखील चर्चेत राहत असतो.
संकर्षण सोशल मीडियावर काहीना काही पोस्ट शेअर करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे अनेक फोटो, व्हिडीओ व त्याच्या कामाविषयी महिती देत असतो. अशातच नुकतीच त्याने त्याच्या मूळ गावी म्हणजेच अंबेजोगाई इथे भेट दिली आणि याचे काही खास क्षण त्याने सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. संकर्षणने त्याच्या इन्स्टाग्रामवर अंबेजोगाईमधील घराचे व मंदीराचे काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
हे खास फोटो शेअर करत संकर्षणने असं म्हटलं आहे की, “आज अंबेजोगाईमध्ये नाटकाचा प्रयोग आहे. आमचं मूळ गांव अंबेजोगाई. इथे आमचा छोटासा वाडा आहे. आमच्या या वाड्यात मारुतीचं मंदिरही आहे. आज नाटकवाली मंडळी घरी आली. योगेश्वरी देवीचं दर्शन घेतलं आणि मग दिवस सरता सरता आद्यकवी मुकुंदराज स्वामी समाधी स्थळी जाउन आलो. फार शांत वाटलं.”
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “लहानपणापासून अंबेजोगाईची ओढ आहेच. ऊन्हाळ्याची सुट्टी लागली की, हनूमान जयंतीला घरच्या मारूतीच्या उत्सवाला यायचं. हे सगळं आठवत आठवत आजचा दिवस छान गेला. आता रात्री आपल्याच मूळ गावांत आपणच लिहिलेल्या आणि काम करत असलेल्या नाटकाचा प्रयोग करायचा. याचा आनंद काही वेगळाच आहे.”
आणखी वाचा – ‘12th Fail’ फेम अभिनेता झाला बाबा, विक्रांत मेस्सीच्या घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
दरम्यान, संकर्षणचे रंगभूमीवर सध्या ‘नियम अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ या नाटकांसह त्याचा ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा कवितांचा कार्यक्रमही सुरू आहे. तसेच त्याच्या नाटकांना व कवितांच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसादही मिळत आहे.