‘हसीन दिलरुबा’, ‘छपाक’, ‘१४ फेरें’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट व ‘मिर्झापुर’, ‘क्रिमिनल जस्टीस’, ‘ब्रोकन बट ब्युटीफुल’ अशा अनेक सीरिजमधून आपल्या अनोख्या भूमिकांची व अभिनयाची दखल घ्यायला भाग पाडणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ’12thFail’ या चित्रपटामुळे तर अभिनेता लोकप्रियतेच्या व प्रसिद्धीच्या अगदी शिखरावरच पोहोचला आहे. या चित्रपटासाठी नुकताच त्याला फिल्मफेअर हा मानाचा पुरस्कारदेखील मिळाला आहे. अशातच अभिनेत्याच्या आयुष्यात आणखी एक आनंदी क्षण आला आहे. विक्रांतच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन आले.
’12th Fail’ या चित्रपटामुळे विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात मिळालेले यश आणि खासगी आयुष्यातही त्याला मिळालेली ही आनंदाची बातमी ऐकून अभिनेत्यासह त्याच्या अनेक चाहत्यांचा आनंद द्विगुणित झाला आहे. काल विक्रांतने सोशल मीडियावर आपण बाबा झाल्याची पोस्ट शेअर केली होती. त्याला मुलगा झाला असून त्याने हा आनंदाचा क्षण चाहत्यांबरोबरही साजरा केला आहे.
विक्रांतेन इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये, “आम्हाला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की, आमच्या घरी एका चिमुकल्याचे आगमन झाले आहे. त्यामुळे आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. आम्हा दोघांना मुलगा झाला असून त्या लहान जीवाला शितल व विक्रांत यांच्याकडून खूप सारे प्रेम” असे म्हटले आहे.
आणखी वाचा – “तो माझ्यावर चिडचिड करत…”, हेमा मालिनीच्या लेकीचं आधीच नवऱ्याबरोबर बिनसलं होतं, म्हणालेली, “त्याच्या गरजा…”
विक्रांत व त्याची पत्नी शितल ठाकूर यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली आहे. हे दोघे सेलिब्रिटी आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी लहान पाहुण्याचे आगमन झाले आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल होताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही कमेंट्स करत दोघांचे कौतुक व अभिनंदन केले आहे.
दरम्यान, विधू विनोद चोप्रा यांच्या ’12th Fail’ या चित्रपटामुळे अभिनेत्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले होते. अशातच आता आगामी काळात तो ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ आणि ‘सेक्टर ३६’मध्ये दिसणार असल्याचे म्हटले जात आहे.