मराठी मनोरंजन विश्वातील ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण’ हा एक महत्त्वाचा पुरस्कार समजला जातो. गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांना आणि त्याच्याशी संबंधित विभागांना सन्मानित करणारा ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ हा पुरस्कार सोहळा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १८ जानेवारी रोजी हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या सोहळ्याला अनेक नामांकित कलाकार आपली हजेरी लावून या सोहळ्याची शान वाढवतात.
‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यालादेखील अनेक कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. नुकतेच या पुरस्कार सोहळ्याचे काही प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. यापैकी एका प्रोमोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. यात जिनिलीया पुरस्कार स्वीकारताना रितेशला प्रेमाने “अहो! हा पुरस्कार तुमच्यासाठी नाही, तर आपल्या मुलांसाठी आहे” असं म्हणते. यावर रितेश भर सोहळ्यात सर्व उपस्थितांसमोर शिट्ट्या वाजवत तिचं कौतुक करतो.
यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखने दिग्दर्शित केलेल्या ‘वेड’ या चित्रपटाने तब्बल नऊ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे. यासंबंधित हातात पुरस्कार घेतलेला एक फोटोही रितेश-जिनिलीया यांनी शेअर केला होता. त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनीही लाईक्स, कमेंट्सद्वारे शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव केला होता.
अशातच रितेश-जिनिलीया यांच्या या नवीन प्रोमोवरदेखील चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच त्यांच्या अनेक चाहत्यांनी रितेशच्या काळ्या सूटचे व जिनिलीयाची लाल रंगाची नेटची साडी हा खास लूक आवडला असल्याचेही म्हटले आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमधील जिनिलीयाच्या मराठी बोलण्याचे व गोड स्वभावाचेही अनेक चाहत्यांनी कौतुक केले आहे.
दरम्यान, यंदाच्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३‘ या पुरस्कार सोहळ्यात बाईपण भारी देवा’, ‘वेड’, ‘झिम्मा २’, ‘सुभेदार’, ‘महाराष्ट्र शाहीर’, ‘वाळवी’, ‘नाळ २’, व ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटांमध्ये पुरस्कारासाठी चांगलीच स्पर्धा मिळाली. पण ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण २०२३’ या पुरस्कारासाठी ‘वेड’ चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवल्याचे पाहायला मिळाले.