बॉलिवूड चित्रपट आणि वाद हे समीकरण आता सर्वांनाच माहीत झाले आहे. अर्थात हा वाद प्रत्येक बॉलिवूड चित्रपटाबाबत होत नाही. पण नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका चित्रपट वादाचे कारण बनला आहे. हृतिक रोशन व दीपिका पदुकोणचा ‘फाइटर’ चित्रपट प्रदर्शित होऊन १२ दिवस झाले आहेत आणि अशातच हा चित्रपट एका वादात सापडला आहे. हा चित्रपट हवाई दलाच्या लढाऊ वैमानिकांबद्दल असून आसाममध्ये तैनात विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. या चित्रपटात हृतिक व दीपिका वायूसेनेच्या अधिकाऱ्यांच्या भूमिकेत दिसत आहेत आणि त्यांचे काही किसिंग व इंटिमेट सीन आहेत.
त्यामुळे वायूसेनेच्या गणवेशात हृतिक-दीपिका यांनी एकमेकांना कीस घेतल्याच्या दृश्यावर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. विंग कमांडर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद तसेच हृतिक व दीपिका यांना मानहानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. विंग कमांडर सौम्यदीप दास यांनी आरोप करत असे म्हटले आहे की, “हवाई दलाच्या गणवेशात कीस घेतानाचे दृश्य हा वायूसेनेच्या गणवेशाचा अपमान आहे. वायूसेनेचा गणवेश हा केवळ एक कापडाचा तुकडा नाही. तर देशाच्या रक्षणासाठी त्याग, शिस्त व अखंड समर्पणाचे ते एक प्रतीक आहे”.

तसेच या नोटीसमध्ये पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की, “हा गणवेश पवित्रतेचे प्रतीक आहे, त्यामुळे चित्रपटात रोमँटिक सीन दाखवण्यासाठी त्याचा अशा पद्धतीने वापर करणे चुकीचे आहे. चित्रपटात अशाप्रकारचे किसिंग सीन दाखविल्याने देशसेवेतील अगणित सैनिकांच्या प्रतिष्ठेला व त्यांच्या बलिदानाला धक्का बसतो. वायू सेनेच्या गणवेशात असताना असे सीन शूट करणे हे गणवेशाच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा अनादर करणे आहे”.
दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त २५ जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या ‘फायटर’ने गेल्या १२ दिवसांत बॉक्स ऑफिसवर १७८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटात हृतिक रोशन व दीपिका पदुकोणशिवाय अनिल कपूर, करण सिंग ग्रोव्हर आणि अक्षय ओबेरॉय यांच्याही मुख्य भूमिका आहेत.