काही दिवसांपूर्वीच दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांचे ‘चौथा अंक’ हे आत्मचरित्र प्रकाशित झाले. या प्रकाशन कार्यक्रमाचे फोटो, व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे पुस्तक प्रकाशित होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच रवींद्र महाजनी यांचे अनपेक्षित निधन झाले. मात्र त्यांच्या निधनापूर्वीच माधवी यांनी हे पुस्तक लिहून पूर्ण केले होते. या पुस्तकात त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या चढउतारांचा उल्लेख केला आहे. यात माधवी यांनी रवींद्र महाजनी व्यसनांच्या आहारी कसे गेले? याबद्दलचा खुलासा केला आहे.
यात माधवी यांनी असं लिहिलं आहे की, “आम्ही मैत्रिणी संध्याकाळी फिरायला जायचो. सहसा आम्ही फाइव्ह गार्डनलाच जात असू. तिथे एकदा रवीची भेट झाली. त्याचे घर तिथून जवळ होते. मग मी व रवी पुन्हा एकमेकांना भेटू लागलो, बोलू लागलो. मी त्याच्या प्रेमात आकंठ बुडाले होते हे त्याच्या तर लक्षात आलंच असणार. पण प्रत्यक्ष शब्दांत मात्र आम्ही कुणीही त्याचा उच्चार केलेला नव्हता. त्यावेळी त्याच्या मित्रांनी, आणखी इतर कुणी; इतकंच काय, त्यानं स्वतःसुद्धा मला सांगितलं होतं की, त्यानं त्याचं शिक्षण अर्धवट सोडलं आहे. आधी डॉक्टर व्हायचं रवीनं खूप मनावर घेतलं होतं. अभ्यास चांगला केला होता. पण त्या सुमारास त्याचा एक प्रेमभंग झाला. रवी अजून सेटल झालेला नसल्याने मुलीच्या आईवडिलांनी दुसऱ्या कुणाशी तरी त्या मुलीचे लग्न लावून दिले. त्यामुळे तो निराश झाला होता.”
यापुढे त्यांनी लिहिले आहे की, “त्यातच त्याला गालगुंड झाले, बरेच दिवस उपचार झाले, अॅडमिट करावे लागले, मेडिकलला जायचे तर इंटरसायन्स आवश्यक होते. त्यानं अभ्यास पुष्कळच केलेला होता. पण तो बरा होऊन आल्यानंतर मात्र त्याचे कशातच लक्ष लागेना. समोर कसलंच ध्येय नाही, मन थाऱ्यावर नाही अशा अवस्थेत व्यसन लागायला काय वेळ? पण व्यसनांसाठी पैसा लागतो, मग त्याने त्यासाठी जुगार खेळायला सुरुवात केली.”
आणखी वाचा – “तो माझ्यावर चिडचिड करत…”, हेमा मालिनीच्या लेकीचं आधीच नवऱ्याबरोबर बिनसलं होतं, म्हणालेली, “त्याच्या गरजा…”
यापुढे माधवी यांनी या पुस्तकात असं लिहिलं आहे की, “आमची ओळख झाली, तेव्हा रवीने मला दारू पितो, जुगार खेळतो इत्यादी बरंच काही सांगितलं होतं. पण काय कोण जाणे… या कशामुळे त्याच्याबद्दल मला त्याच्याविषयी वाटणाऱ्या ओढीमधे जरासुद्धा फरक पडला नाही, उलट हा किती प्रामाणिक आहे, काय खरं असेल ते सगळं मला सांगतो, याचंच मला अप्रूप वाटायचं.”