बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी व अभिनेते धर्मेंद्र यांची मोठी मुलगी ईशा देओल नुकतीच पती भरत तख्तानीपासून विभक्त झाली आहे. काल (६ जानेवारी) रोजी भरत व ईशा यांनी संयुक्तपणे त्यांच्या घटस्फोटाबाबत माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ईशा पती भरत तख्तानीपासून विभक्त झाल्याच्या चर्चा होत होत्या. अखेर काल दोघांनी एका निवेदनाद्वारे त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केला आहे. यात त्यांनी लग्नाच्या १२ वर्षानंतर परस्पर संमतीने आम्ही वेगळे होत आहोत असं म्हटलं.
दरम्यान, ईशा-भरत यांच्या नात्यात त्यांच्या दुसऱ्या लेकीच्या जन्मानंतर दुरावा आला असल्याचे मत स्वत: अभिनेत्रीने व्यक्त केलं आहे. ईशाने २०२०मध्ये ‘अम्मा मिया: स्टोरीज, ॲडव्हाइस अँड रेसिपीज फ्रॉम वन मदर टू अदर’ नावाचं पुस्तक लिहिलं. त्यात तिने सांगितलं होतं की तिच्या दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर ईशा भरतला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे तो चिडचिड करत असल्याचे तिने म्हटले.
आणखी वाचा – मुग्धा वैशंपायनला पदव्युत्तर पदवी, हाती गोल्ड मेडल अन्…; नवऱ्याचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, “बायको तुझा…”
‘डीएनए’च्या वृत्तानुसार, ईशाने तिच्या पुस्तकात असे लिहिले आहे की, “माझ्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर काही काळाने माझ्या लक्षात आलं की, भरत चिडचिड करत होता. त्याला वाटलं की मी त्याच्याकडे नीट लक्ष देत नाही. प्रत्येक नवऱ्याला असं वाटणं अगदी साहजिक आहे, कारण त्यावेळी मी राध्या व मियारा (ईशाची मुली) यांच्या पालनपोषण करण्यात व्यस्त होते. मी माझे पुस्तक लिहिण्यात आणि प्रोडक्शन मीटिंगमध्ये व्यस्त होते. त्यामुळेच त्याच्याकडे दुर्लक्ष झालंय, असं त्याला वाटत होतं. मला माझ्या चुका लगेच लक्षात आल्या.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “भरतच्या गरजा खूप कमी आहेत आणि जर मी त्याची काळजी घेऊ शकत नाही, तर नक्कीच काहीतरी गडबड आहे. यानंतर मी ताबडतोब माझ्या चुका दुरुस्त करायचं ठरवलं. मग मला समजलं की, बराच काळ झाला मी त्याच्याबरोबर डेट नाईट किंवा चित्रपट पाहण्यासाठी गेले नाही. यानंतर मी अनेकदा त्याच्याबरोबर बाहेर जाण्यासाठी छान ड्रेस घालून आवरलं”
दरम्यान, काही दिवसांपूर्वी सासू हेमा मालिनी यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत भरत तख्तानी सहभागी झाला नव्हता. तेव्हापासूनच ईशा-भरत यांच्या नात्याबद्दलच्या अनेक चर्चा सुरू झाल्या. आणि काल जाहीर निवेदनाद्वारे विभक्त झाल्याचं सांगितलं.