आपल्या अभिनयाने ‘नाटकाचे विक्रमादित्य’ अशी वेगळी ओळख निर्माण केलेले एकमेव नाव म्हणजे अभिनेते प्रशांत दामले. प्रशांत दामले हे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्यांच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. आजही त्यांच्या नाटकांना ‘हाऊसफुल्ल’ अशी पाटी लागते. प्रशांत दामले हे अभिनेते असण्याबरोबरच निर्मातेदेखील आहेत. त्याचबरोबर ते उत्तम वक्तेदेखील आहेत. (Prashant Damle Interview)
प्रशांत दामले यांनी नुकतीच ‘मित्र म्हणे’ या यूट्यूब चॅनेलवर एक मुलाखत दिली. त्यात त्यांनी त्यांच्या वैवाहिक व व्यावसायिक आयुष्याविषयी काही आठवणी शेअर केल्या. यावेळी त्यांना मुलाखतीत पत्नीविषयी मजेशीर प्रश्न विचारण्यात आला. “तुमच्या प्रसिद्धीच्या काळात तुमच्यामागे अनेक चाहत्यांची गर्दी होती, तर यावेळी तुमच्या पत्नीला तुमच्याविषयी कधी असुरक्षितता वाटली नाही का?” असा मजेशीर प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना प्रशांत दामले असं म्हणाले की, “हो नक्कीच. तिला असुरक्षितता वाटली असणार आणि पत्नी म्हणून ही असुरक्षितता असणे अत्यंत स्वाभाविकच आहे. पण आजवर तिने मला याबद्दल कधीही काहीही म्हटले नाही. मी लग्न झाल्यावर अभिनेत्री वर्षा उसगांवकरला उचलून घेतले होते. पण यावर तिने कधीही काहीही विचारलं नाही. या अशावेळी तुमच्या जोडीदारावर विश्वास असावा लागतो. आमच्या लग्नाला आतापर्यंत ३५ वर्षे झाली असून आजवर तिने कधीही मला याबद्दल एक प्रश्न विचारला नाही.”
यापुढे आपल्या पत्नीविषयी कौतुक करताना ते असं म्हणाले की, “२७ डिसेंबर १९८५ ला माझं लग्न झालं. १९८७ मध्ये मला पहिली मुलगी झाली. अन् १९९२ ला दुसरी मुलगी झाली. त्याचवर्षी मी नोकरी सोडली. त्याआधी मी ५ वर्षं बेस्टमधून सुट्टी घेऊन नाटक करायचो, या पाच वर्षांत आपण कसे जगलो याचं मी अन् माझ्या पत्नीने गणित मांडलं. माझ्या पगाराशिवाय आपण घर चालवू शकतो का याचा अंदाज घेतला. मी फक्त नाटकात काम करत होतो, अभिनय करत होतो, पण घर सांभाळणं हे खूप कठीण काम आहे इतकी वर्षं माझ्या वेळापत्रकाप्रमाणे गौरीने तिचं आयुष्य सांभाळून घेतलं. पण या काळात तिने कधीच कोणत्याच समस्या माझ्यापर्यंत येऊ दिल्या नाहीत.”
सध्या प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर गाजत असून गेली अनेक दशके चित्रपट व नाटकांत काम करत ते प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. आजवर इतक्या प्रयोगानंतरदेखील त्यांचा नाटक करण्याचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.