छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहेरे. प्रार्थनाने काही दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतदेखील काम केले होते. या मालिकेतील तिच्या व श्रेयस तळपदेच्या भूमिकेला प्रेक्षकांनी चांगलेच डोक्यावर घेतले होते. तिची या मालिकेतील भूमिका आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. ‘मितवा’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ अशा अनेक चित्रपटांत काम करत तिने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ती सोशल मीडियावरदेखील तितकीच सकीय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे. (Prarthana Behere On Instagram)
प्रार्थना सोशल मीडियाद्वारे तिचे अनेक मनमोहक फोटो शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच तिने शेअर केलेल्या एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती तिच्या नवऱ्याबरोबर पूजा करताना दिसत आहे. तिने नुकतीच एक नवीन वास्तु घेतली असून या व्हिडीओत ती तिच्या नवऱ्यासह नवीन वास्तूची पूजा करताना दिसत आहे आणि ही वास्तु त्यांचं नवीन ऑफिस असल्याचे दिसत आहे.
या व्हिडीओद्वारे प्रार्थनाने तिच्या नवीन ऑफिसची खास झलक तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. या व्हिडीओत त्यांची ही नवीन वास्तु अत्यंत प्रशस्त व मोकळी दिसत आहे. तसेच या व्हिडीओखाली तिने ‘कृतज्ञ’ कॅप्शन दिलं असून यापुढे तिने तिच्या नवऱ्याच्या प्रोडक्शन हाऊसचादेखील उल्लेख केला आहे. त्याचबरोबर यापुढे तिने ‘नवीन ऑफिस’ व ‘ऑफिस पूजा’ असे अनेक हॅशटॅग्ससुद्धा लिहिले आहेत. त्यामुळे या व्हिडीओद्वारे तिने त्यांच्या प्रोडक्शन हाऊसचं नवीन ऑफिस घेतल्याचे दिसत आहे.
दरम्यान, तिने शेअर केलेल्या या व्हिडीओखाली मराठीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्रिया मराठे, दीप्ती देवी यांसह अभिनेता कुशल बद्रिके व जयवंत वाडकर यांनीदेखील तिला अभिनंदन म्हणत शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर तिच्या अनेक चाहत्यांनीदेखील तिला या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये शुभेच्छा दिल्या आहेत.