नुकताच काल (१५ जानेवारी) रोजी अवघ्या देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या जल्लोषात पार पडला. दरवर्षी १४ जानेवारीला मकरसंक्रांत साजरी केली जाते. पण यावर्षी मकरसंक्रांतीचा सण १५ जानेवारीला आला. त्यामुळे सर्वांनी ‘तिळगुळ घ्या गोड गोड बोला’ म्हणत मकरसंक्रांतीचा सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला. मनोरंजन विश्वातदेखील अनेक कलाकार मंडळींनी सोशल मीडियाद्वारे काही खास फोटो शेअर करत त्यांच्या चाहत्यांना मकरसंक्रांतीनिमित्त खास शुभेच्छा दिल्या.
यंदाची मकरसंक्रांत मराठीतील काही कलाकारांसाठी खास होती. मराठी मनोरंजन विश्वात नुकतेच काही लग्न पार पडले. यात अभिनेता प्रसाद जवादे व अभिनेत्री अमृता देशमुख यांचाही यंदाचा लग्नानंतरचा पहिलाच संक्रांतसण मोठ्या आनंदात पार पडला. अमृता-प्रसादच्या पहिल्या मकरसंक्रांतीनिमित्त दोघांनी खास मकरसंक्रात स्पेशल लूक केला होता. त्यांच्या या खास लूकचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशातच सोशल मीडियावर त्यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
अमृता-प्रसाद यांनी घेतलेल्या खास उखण्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमृताने प्रसादसाठी खास उखाणा घेत असे म्हटले आहे की, “आजच्या या संध्याकाळी जमल्यात साऱ्या साम्राज्याच्या या सख्या, प्रसादचे नाव घेते आज खरी कळत आहे मकरसंक्रांतीची व्याख्या.” तर प्रसादनेदेखील लाडक्या बायकोसाठी उखाणा घेतला. यावेळी त्याने अमृतासाठी खास उखाणा घेत असे म्हटले की, “आजच्या या मकरसंक्रांतीच्या दिवशी अमृताने घातला आहे दागिना विथ हलवा, इथून पुढे साम्राज्यकऱ्यांनो बघत राहा आमचा जलवा.”
अमृता-प्रसाद यांच्या उखाण्यानंतर उपस्थितांनी टाळ्या वाजवत त्यांचे कौतुक केलेले पाहायला मिळाले. तसेच दोघांच्या या खास उखाण्यावर साऱ्यांनीच टाळ्या वाजवत त्यांना दाद दिली आहे. दरम्यान, या उखाण्याच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला आहे.