२०२४ हे नवीन वर्ष मनोरंजनासाठी खूपच रोमांचक असणार आहे. कारण या वर्षात अनेक गाजलेल्या चित्रपट व वेबसीरिजचे सीकवेल्स (पुढील भाग) येणार आहेत. येत्या नवीन वर्षात पंचायत, आश्रम, पाताल लोक, मिर्झापुरसारख्या अनेक लोकप्रिय सीरिजचे नवीन भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तर जाणून घेऊयात यंदाच्या वर्षी कोणकोणत्या नवीन सीरिजचे भाग प्रदर्शित होणार आहेत.
मिर्झापूर : ‘मिर्झापूर’ या लोकप्रिय वेबसीरिजचे आतापर्यंत दोन सिझन प्रदर्शित झाले आहेत. दोन्ही सीझन प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाले. अशातच येत्या मार्च महिन्यात या सीरिजचा तिसरा सीझन प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या तिसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

पंचायत : पंचायत या सीरिजचे आतापर्यंत दोन सीझन्स चाहत्यांच्या भेटीला आले असून आता या लोकप्रिय सीरिजचा तिसरा सीझनही लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच अॅमेझोन प्राइम या ओटीटी माध्यमाने या सीरिजचा पहिला लुक प्रदर्शित केला. जानेवारी महिन्याच्या अखेरीस ही सीरिज प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात आहे.

आश्रम : बाबा निरालाचे काळे कारनामे दाखणारी आश्रम ही सीरिज प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली. या सीरिजचे आतापर्यंत ३ सीझन चाहत्यांच्या भेटीला आले आहेत. अशातच आता या सीरिजचा चौथा सीझनही प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जात. अद्याप याबाबत अधिकृतपणे घोषणा करण्यात आली नाही. पण चाहते चौथ्या सीझनची खूपच वाट पाहत आहेत.

पाताल लोक : सस्पेन्स, थ्रीलर व क्राइमने भरलेल्या या सीरिजचा पहिला सीझन चाहत्यांना खूपच आवडला होता. अशातच आता या सीरिजचा दूसरा सीझन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र याबद्दलची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

काला पानी : २०२३ मधील सर्वात गाजलेली वेबसीरिज म्हणजे काला पानी. प्रदर्शनाच्या अवघ्या काही दिवसांतच ही सीरिज जवळपास ११ देशांमध्ये ट्रेंडिंगवर होती. त्यामुळे या लोकप्रिय सीरिजच्या दुसऱ्या सीझनची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

कोटा फॅक्टरी : कोटा फॅक्टरी ही सीरिज मुलांच्या शिक्षण व्यवस्थेवर भाष्य करते. या सीरिजचे आतापर्यंत २ सीझन्स आले असून येत्या वर्षात या सीरिजचा तिसरा सीझनही चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ही सिरिज प्रदर्शित होणार आहे.