मराठी व हिंदीसह गुजराती भाषेत अभिनय करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते म्हणजे मनोज जोशी. मनोज जोशी यांनी आपल्या दमदार अभिनयकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘हेरा फेरी’, ‘चुप चुप के’, ‘हंगामा’, ‘खट्टा मीठा’, ‘देवदास’सारख्या अनेक गाजलेल्या हिंदी चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तसेच ‘नारबाची वाडी’, ‘दशक्रिया’, ‘फक्त लढ म्हणा’, ‘भाऊबळी’, ‘भारतीय’ यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांतदेखील त्यांनी अभिनय केला आहे. यासंह त्यांनी अनेक मालिकांमधूनदेखील त्यांच्या अभिनयाची छाप सोडली आहे.
अशातच नुकताच त्यांचा ‘695’ हा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ५०० वर्षांच्या मोठ्या संघर्षानंतर प्रभू श्री राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली. हाच संघर्षमय प्रवास ‘695’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या चित्रपटात अभिनेते मनोज जोशी यांची वकिलाची प्रमुख भूमिका आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने संवाद साधण्यासाठी मनोज जोशी यांनी ‘इट्स मज्जा’च्या ‘हॅशटॅग ठाकूर विचारणार’ या मुलाखतीच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. येत्या २२ जानेवारी रोजी रामजन्मभूमी अयोध्येत श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठापणा सोहळा पार पडणार आहे आणि या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जोशी यांचा ‘695’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
हेही वाचा – ‘काला पानी’, ‘आश्रम’, अन् ‘पाताल लोक’, आगामी काळात येणार ‘या’ गाजलेल्या वेबसीरिजचे नवीन सीझन, वाचा ‘कधी’ व ‘कुठे’ पाहू शकाल
यावरुन मनोज जोशी यांना या चित्रपटाच्या संदर्भात “अशा प्रकारच्या चित्रपटांना बऱ्याचदा ‘प्रचारकी’ (प्रोपगंडा) चित्रपट म्हटले जाते, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?” असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत मनोज जोशी यांनी असे म्हटले की, “त्याकाळी कारसेवकांच्या निर्घुणपणे हत्या केल्या गेल्या होत्या. त्यांच्या छातीत गोळ्या घालून त्यांना मारण्यात आले होते. त्यांना रेतीच्या पोत्यात भरुन शरयू नदीत फेकण्यात आले होते. यानंतर एका आक्रांत्याने मंदीर पाडले होते. याचा उल्लेख आहे. या सगळ्या गोष्टी इतिहासात आहेत, पण त्या गोष्टी आपल्याला कधी नीट सांगितल्या गेलेल्या नाहीत आणि हा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजे जर कोणाला प्रोपगंडा वाटत असेल तर भले वाटू देत.”
यापुढे त्यांनी असे म्हटले की, “या चित्रपट बनवण्यामागची भावना शुद्ध आहे. एखादी संघर्षगाथा लोकांपर्यंत पोहोचावी असं निर्मात्यांना वाटत असेल, तर त्यात काहीच गैर नाही असं मला वाटतं. एखादा इतिहास जर लोकांना दाखवला तर तो प्रॉपगंडा कसा होऊ शकतो? त्यामुळे असे चित्रपट कुणाला प्रॉपगंडा वाटत असतील तर हा त्यांचा प्रश्न आहे. मला तरी यात काही गैर वाटत नाही.” दरम्यान, या चित्रपटात मनोज जोशी यांनी वकिलाची भूमिका साकारली असून या चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे कौतुक होत आहे.