Aarti Solanki Video : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आरती सोळंकीने आजवर अनेक कलाकृतींमध्ये काम केलं. तिने तिच्या विनोदी अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना मनमुराद हसवले आहे. मालिका, चित्रपट व विनोदी कार्यक्रमांमध्ये आरती नेहमीच दमदार भूमिका करताना दिसली असून तिच्या या भूमिकेचे अनेकदा कौतुक झालं. एकीकडे तिच्या भूमिकेचे कौतुक होत असताना वजनावरून तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं आहे. असं असतानाही तिने दमदार अभिनय दाखवत सर्वांची तोंड बंद केली. आरती गेल्या अनेक दिवसांपासून सिनेसृष्टीत सक्रिय नव्हती. तरी सोशल मीडियाद्वारे ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतंच आरती तिच्या वेटलॉस जर्नीमुळे चर्चेत आली होती. आरतीने तब्बल ५० किलो वजन घटवत सर्वांचे लक्ष वेधले होते. आता बऱ्याच काळानंतर ती सिनेसृष्टीत परतण्यासाठी सज्ज झाली आहे. (Aarti Solanki talks about her humiliation on sets)
‘इट्स मज्जा’च्या “मज्जाचा अड्डा” या कार्यक्रमात नुकतंच आरतीने हजेरी लावली होती. यावेळी तिने तिच्या वेटलॉस जर्नीपासून ते सिनेसृष्टीततील तिला आलेल्या अनुभवाबद्दल बरंच काही बोलली. आरती तिच्या सुरुवातीच्या काळात एका लोकप्रिय कार्यक्रमात काम करायची. त्यावेळी त्या कार्यक्रमाच्या सेटवर आलेले अनुभव सांगताना तिला झालेल्या त्रासाविषयी स्पष्टपणे बोलली आहे.
ती यात म्हणाली, “२०१० मध्ये मी एक रिॲलिटी शो करत होते. तर त्या शोच्या सेटवर माझा खूप अपमान व्हायचा. मी एकतर वयाने आणि अनुभवाने नवीन होते आणि त्या सगळ्यांमध्ये खूप लहान होते. कसं होतं की जेव्हा त्या स्किटचं शूट असायचं, त्याच्या एक दिवसाआधी आमचं रिहर्सल व्हायचे. तर त्या रिहर्सल रूममध्ये मी माझ्या सह-कलाकारासह स्किट्सचं रिहर्सल करायचे. मी कधीही बाहेर जाऊन कोणाशी गप्पा मारत नव्हते. तीच गोष्ट सगळ्यांना आवडायची आणि माझ्या या चांगल्या गोष्टी चॅनलपर्यंत पोहोचल्या जात होत्या.”
हे देखील वाचा – क्रांती रेडकरने घराच्या छतामधून साप बाहेर काढत असलेल्या महिलेचा व्हिडीओ केला शेअर, नेटकऱ्यांना आठवले समीर वानखेडे
“एका काळापर्यंत या गोष्टी ठीक होत्या. त्यानंतर मात्र पुढे अशा काही गोष्टी घडल्या की, त्या मला सहनच झाल्या नाही. मला रिहर्सल किंवा शूटच्या वेळी खूप घाम यायचा, त्यामुळे मी सुरुवातीला डिओ वापरायचे. जर मी सेटवर डिओ मारून गेले की, इतर कलाकार डिओ चांगला असल्याचं म्हणायचे. पण तेवढ्यात एक व्यक्ती समोर आला आणि त्या व्यक्तीला म्हणाला, “अरे काय नाही, हे डिओ ३०-३० रुपयाला पण मिळतात.” पुढे जेवणाच्या वेळी घडलेल्या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी जेव्हा सेटवर जेवायला बसायचे. तेव्हा त्यातील एक कलाकार ‘जेवण छान आहे ना?’ म्हणाली. मी त्यावर ‘हो’ बोलली आणि जेवत होते. नेमकं त्या प्रॉडक्शन हाऊसमधील एक जण माझ्यासमोर आला आणि म्हणाला की, “काही लोकांना जेवायला मिळत नाही. म्हणून आम्हाला ते ठेवावं लागतं.”, असा अनुभव तिने सांगितला.
हे देखील वाचा – “माणसाचं कर्म चांगलं असलं की…”, हेमांगी कवीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली, “त्याला रात्रीची…”
ती पुढे म्हणाली, “जेव्हा मी या शोमध्ये आले, तेव्हा माझ्याकडे दोन जीन्स पॅन्ट व चार सदरे असायचे. तर त्या सेटवर आमचे इस्त्रीवाले दादा होते, ते माझ्या कपड्यांना इस्त्री करायचे. मात्र, माझ्या कपड्यांना इस्त्री करण्यावरून एक प्रसिद्ध अभिनेत्री त्यांना म्हणाली होती की, “काही नाही रे, काहीही दिलं ना की ते कोणीही करतं.” सेटवर झालेल्या अपमानाबद्दल तिने वाहिनीला प्रश्न करताना ती म्हणाली, “त्या शोच्या सेटवर नेमकं काय चाललंय, हे संबंधित चॅनलवाल्यांना माहिती आहे का मला काय त्रास होतं? मी या शोचे जवळपास तीन सीझन केले. पण या काळात माझा झालेला अपमान मी सहन केला. पण काही काळानंतर ते अपमान सहन करण्याची क्षमता माझ्यात संपली होती. पुढे जेव्हा मला बाहेर काम मिळायला लागली. तेव्हा मी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला होता.” एकूणच शोच्या सेटवर झालेल्या त्रासाबद्दल आरती मुक्तपणे बोलली आहे.