मराठमोळी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने आपल्या अभिनयातून मनोरंजनसृष्टीत स्वतःच वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. क्रांतीने आजवर बऱ्याच चित्रपटात काम केलं आहे. ‘जत्रा’, ‘खो-खो’, ‘शिक्षणाच्या आईचा घो’, ‘तीन बायका फजिती ऐका’ यासारख्या चित्रपटातील तिचा अभिनय प्रेक्षकांना बराच आवडला. क्रांती एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच पण ती एक जबरदस्त नृत्यांगणाही आहे. क्रांती सध्या सिनेसृष्टीपासून लांब असली तरीही ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. विविध व्हिडीओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. आताही तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यात एक मुलगी घरातील छतातून मोठ्या सर्पांना बाहेर काढताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने या परिस्थितीत स्वतः काय केलं असतं हे व्हिडीओतून सांगितलं. (Kranti share video of woman pulling snake from roof)
क्रांतीने शेअर केलेल्या व्हिडिओत एक महिला हातात काटी घेऊन उंचावर चढलेली दिसत आहे. काटीच्या मदतीने ती घरातील छतातून आत असलेले सर्प बाहेर काढत आहे. हा व्हिडिओ शेअर करत क्रांती सांगते, “आता बघाच, एकतर मला जर असं कळलं असतं की माझ्या घरात त्या फॉलसिलिंकमध्ये सर्प आहेत. तर माझ्या घरापासून किमान एक १० किलोमीटरवर मी पलायन केलं असतं. माझ्या दुसऱ्या घरी मी निघून गेले असते”.
क्रांती पुढे सांगते, “त्या व्हिडीओतील ती महिला किती शांत दिसत आहे. तिला माहित आहे ती काय करते आहे. ती नक्कीच त्या कामात पारंगत असणार यात कोणतंच दुमत नाही. मला खरंच जर हे कळलं असतं की असं काही रेस्क्यू ऑपरेशन माझ्या घरात होणार आहे तरीही मी १० किमीवर पळून गेले असते. मी तिथे थांबणं शक्यच नव्हतं”, असं म्हणत तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह कलाकरांनीही यावर कमेंट केले आहेत. अभिनेत्री अमृता खानविलकर कमेंट करत म्हणते, हे काय आहे? कुठून मिळत तुला हे? बाप रे! असं लिहीलं आहे. तर एका नेटकऱ्याने तर समिर सरांच्या पण आयुष्यात खूप सर्प आहेत असं लिहिलं आहे त्यावर क्रांतीनेही प्रतिक्रिया देत खरंच असं म्हणत हसून दाखवलं आहे.