अभिनेत्री हेमांगी कवी ही सोशल मीडियावर बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असते. आजवर हेमांगीने आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांमध्ये नेहमीच सोडली आहे. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे बिनधास्तपणे मत मांडताना दिसते. चाहतेही तिच्या या बिनधास्तपणाचे वेळोवेळी कौतुक करताना दिसतात. बरेचदा हे नेटकरी हेमांगीला ट्रोल करताना दिसतात, यामुळे ती चर्चेत ही आली आहे. एखादा सामाजिक मुद्दा असो किंवा खासगी आयुष्यामधील एखादा प्रसंग, हेमांगी याबद्दल सोशल मीडियावर आपले रोखठोक मत मांडताना दिसते. (Hemangi Kavi New Post)
हेमांगी तिचे अनेक फोटोज आणि डान्सचे रील व्हिडीओज नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच हेमांगीच्या एका पोस्टने सोशल मीडियावर साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेमांगीने मराठमोळा लूक करत एक फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. यांत हेमांगीने हिरव्या रंगाची साडी नेसली असून केसात गजरा घालून, तसेच हातात कर्म असे लिहिलेली अंगठी घातली आहे. गालावर हात ठेवून रिंग फ्लॉन्ट करतानाचा तिचा हा फोटो तिच्या हातातल्या अंगठीने लक्ष वेधून घेतोय.
कर्म असं लिहिलेली पारंपरिक अंगठी घालून हेमांगीने कर्मावरून भाष्य करत एक कॅप्शनही या फोटोला दिलं आहे, “आपल्याला जास्ती काय कळत नाय, पण येक कळतं, माणसाचं कर्म चांगलं असलं की नाय त्याला रात्रीची झोप लय भारी लागती अन् झोप समद्या, समद्या मंजी समद्या, सुखांचं मुळ हाय! ज्याला चांगली झोप तो लय मोट्टा तोप! जय हिंद, जय महाराष्ट्र!” असं म्हणत तिने हा फोटो पोस्ट केला आहे.
तिच्या या मराठमोळ्या लुकच्या फोटोवर अनेकांनी हार्ट ईमोजी शेअर केली आहे. शिवाय तिच्या या लुकला पसंती दर्शविली आहे. हेमांगी स्पष्टव्यक्ती अभिनेत्री आहे. तिने पोस्ट केलेल्या बेधडक पोस्टवरून अनेकदा ती नेटकऱ्यांच्या कचाट्यात अडकली आहे. मात्र यावर स्पष्टपणे भाष्य करत हेमांगीने वेळोवेळी उत्तर दिलं आहे. निवडक, लक्षवेधी भूमिका साकारणारी अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या बोल्ड व बिनधास्त स्वभावामुळे खऱ्या अर्थाने ओळखली जाते. कोणत्याही विषयावर ती खुलेपणानं भाष्य करते म्हणून अनेकांच्या नजरेत तिचं स्थान उंचावलेलं आहे.