‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आणि या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. महाराष्ट्रातचं नव्हे तर परदेशातील महिला वर्गालाही या कार्यक्रमाची भुरळ पडली आहे. आदेश बांदेकर पैठणी घेऊन कधी येणार असं सर्वच महिलांना वाटत असतं. आता मात्र परदेशातील महिलावर्गासाठी आदेश बांदेकर परदेशवारीला गेले होते. ‘महाराष्ट्र मंडळ, दुबई’ यांच्या वतीने आयोजित ‘खेळ मांडियेला’ या कार्यक्रमासाठी यंदाच्या दिवाळीत बांदेकर दुबईला पैठणी घेऊन गेले होते. (Aadesh Bandekar In Dubai)
ढोल ताशांच्या गजरात, भव्य जल्लोषात महाराष्ट्राच्या लाडक्या आदेश भाऊजींच दुबईत स्वागत करण्यात आलं. शनिवार, दिनांक ११ नोव्हेंबर २०२३रोजी दिवाळीच्या पूर्व संध्येला, MPFS दुबई म्हणजेच महाराष्ट्र मंडळ, दुबई येथे सुवर्णपर्व दिवाळी सण साजरा करण्यात आला आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आदेश बांदेकर उर्फ आदेश भावोजी यांनी हजेरी लावली होती. यावेळी भारताप्रमाणेच दुबईतही त्यांचं औक्षण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात, भव्य जल्लोषात त्यांचं झालेलं स्वागत या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय.
२०२३ हे MPFS, दुबईचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून आदेश बांदेकर यांच्या “खेळ मांडियेला” या कार्यक्रमाने त्यांचं यंदाचं वर्ष उजळून निघालं. यावेळी या कार्यक्रमात दुबईतील माऊलींना पन्नासावे वर्ष आणि पन्नास पैठण्या जिंकायची संधी मिळाली. यावेळी आदेश बांदेकर म्हणाले, स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्यासाठी जगणं हे माझं तत्व आहे. मी राजकारण कधी करणार नाही माऊली पण समाजकारणाचा मार्ग कधीही सोडणार नाही. म्हणून मी बाळासाहेबांना दिलेला शब्दही मी कधी विसरणार नाही आणि मी कायम उद्धवजींबरोबरचं काम करत राहणार. हे ऐकून एका चाहतीने पुढे येत, तिचं मनोगत मांडत ४० वर्ष अविरतपणे शिवसेनेसाठी काम केल्याचं म्हटलं. यावेळी त्या माऊलीच्या आणि त्यांच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले”.
‘खेळ मांडियेला’ कार्यक्रम नुकताच दुबईत पार पडला. यावेळी तेथील चाहत्यांनी आदेश बांदेकर यांचं खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत केलेलं पाहायला मिळालं. त्या सोहळ्याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.