काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. सिद्धार्थने त्याच्या आईचं दुसरं लग्न अगदी थाटामाटात करुन दिलं. गेल्या काही वर्षांपासून सीमा चांदेकर या एकट्याच संपूर्ण घर सांभाळत होत्या. पण सीमा यांनी नव्याने संसार करायचा ठरवलं आणि सिद्धार्थ व मिताली मयेकरनेही त्याला हसत होकार दिला. आता सीमा चांदेकर त्यांच्या जोडीदाराबरोबर आनंदाने संसार करत आहेत. यंदाच्या दिवाळीचा त्यांचा हा पहिलाच पाडवा आहे. याचबाबत सिद्धार्थाने भाष्य केलं आहे. (siddharth chandekar and mitali mayekar diwali celebration)
दिवाळी पाडव्यानिमित्त सिद्धार्थ व मितालीने ‘इट्स मज्जा’शी दिलखुलास संवाद साधला. यावेळी सिद्धार्थला त्याच्या आईच्या दिवाळी पाडव्याबाबत विचारण्यात आलं. तेव्हा सिद्धार्थ म्हणाला, “लग्न झाल्यानंतर जसं आपले आई-बाबा तुम्हीच आता सणवार करा, प्लॅन करा असं समजुतदारीने सांगतात. आम्ही त्यामध्ये सहभागी होऊ पण प्लॅन तुम्ही करा असं म्हणतात. आता ही जबाबदारी आमच्या दोघांची आहे”.
“आईला आम्ही म्हटलं की, यंदाचा पाडवा तू सेलिब्रेट कर. ती आताल तिच्या नवऱ्याबरोबर ट्रीपला चालली आहे. ती इथे नाही. तिने मला सांगितलं की, मी लक्ष्मी पूजन, पाडवा वगैरेसाठी इथे नसणार. मी फिरायला चालली आहे. त्यानंतर मला असं वाटलं की, तू जा तुला हवं ते कर. दिवाळी फराळाचा ती व्यवसाय करते. परदेशात वगैरे तिला फराळाची ऑर्डर असते. दसऱ्याचा दिवस संपला की, ती फराळाची ऑर्डर घ्यायला सुरुवात करते. तिचं काम दिवाळीपर्यंत सुरुच असतं”.
आणखी वाचा – सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकरने खरेदी केली आलिशान कार, म्हणाला, “बायको मला तुझा…”
“ती फिरायला गेल्यावर मी म्हटलं ठिक आहे आपण आता भाऊबीजलाच भेटुया. भाऊबीजलाच आमचं कुटुंब एकत्र येतं. माझ्या बहिणी वगैरे घरी येतात. तिच्या आयुष्यामध्ये मी आता हस्तक्षेप करावं असं मला वाटत नाही. कारण २० वर्षांनंतर तिला तिचा संसार मिळाला आहे. आणि तो तिच्यापेक्षाही जास्त माझ्यासाठी महत्त्वाचा आहे”. सिद्धार्थ व मितालीचा समजतूदारपणा खरंच कौतुकास्पद आहे. तसेच दोघांनीही मिळून आईचा केलेला सांभाळ आणि सिद्धार्थचे संस्कार त्याच्या बोलण्यामधून व कृतीतून दिसून येतात.