आपल्या अभिनयाने व नृत्याने मराठीसह हिंदी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारी अमृता खानविलकर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. अमृता सध्या तिच्या आई-वडिलांसह लंडनमध्ये गेली असून लंडनमध्ये ती तिच्या आई-वडिलांसह सुट्ट्यांचा मनमुरादपणे आनंद लुटत आहे. या लंडन ट्रीपचे काही खास फोटो तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केले आहेत. या फोटोद्वारे अमृताच्या लंडनवारीचे काही खास क्षण पाहायला मिळत आहे.
अमृता लंडनमध्ये पोहोचल्यापासून लंडनमधील अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत आहे. नुकत्याच शेअर केलेल्या एका पोस्टद्वारे तिने “एका विशिष्ट वयानंतर आपल्या पालकांबरोबर फिरणे म्हणजे लहान मुलांबरोबर प्रवास करण्यासारखे आहे.” असं म्हटलं होतं. तसेच यापुढे तिने “या प्रवासात तुम्हाला एका गोष्टीला सर्वात आधी प्राधान्य दिले पाहिजे ते म्हणजे त्यांचे खाणंपिणं आणि मग त्यांच्याभोवती फिरण्याची ऊर्जा”. असं म्हटलं होतं.
अमृताच्या या पोस्टवर कलाकारांसह तिच्या अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्स करत चांगलाच प्रतिसाद दिला होता. अशातच या पोस्टखाली अमृताच्या एका चाहतीने तिला तिच्या नवऱ्याबद्दलचा प्रश्न विचारला आहे. चाहतीने “तू हिमांशू म्हणजेच नवऱ्याबरोबर कधीच प्रवास का करत नाहीस? तू नेहमीच तुझ्या आई किंवा बहिणीबरोबर फिरायला जात असते. पण तू व हिमांशु तुम्ही क्वचितच कुठेतरी एकत्र फिरायला जाता” असं म्हटलं आहे.

यावर अमृताने उत्तर देत असं म्हटलं आहे की, “हिमांशू हा इन्स्टाग्रामवर नाही. त्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे, पण तो कोणाला फॉलो करत नाही. तो इन्स्टाग्रामवर जास्त पोस्ट वगैरे करत नाही. त्यामुळे फोटो टाकण्यात काही अर्थ नाही. शिवाय काही गोष्टी आहेत, ज्या आम्हाला पूर्णपणे खासगी ठेवायला आवडतात.”
दरम्यान, अमृताच्या या उत्तरावर त्या चाहतीने पुन्हा तिला उत्तर देत असं म्हटलं आहे की, “कृपया कधीतरी पोस्ट करा. कारण मी तुम्हा दोघांची खूप मोठी चाहती आहे. ‘नच बलिये’पासून मला तुमची जोडी आवडते. मला तुम्हा दोघांची खूप आठवण येते. त्यामुळे कृपया कधीतरी एकत्र काहीतरी पोस्ट करा”.