मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेता शरद पोंक्षे हे त्यांच्या बेधडक विधानांमुळे सतत चर्चेत असतात. आता ते त्यांच्या ‘स्वातंत्र्य वीर सावकर’ या चित्रपटावर केलेल्या एका पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. अभिनेता रणदीप हुड्डा दिग्दर्शित हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. यामध्ये रणदीपने सावरकरांची भूमिका साकारली असून अभिनेत्री अंकिता लोखंडेने सावरकरांची पत्नी यमुनाबाई यांची भूमिका केली आहे. पण आता पोंक्षे यांच्या पोस्टवरुन ते नक्की काय म्हणणार हा प्रश्न सर्वांना पडला आहे. (sharad ponkshe on swatantrya veer sawarkar)
त्यांनी आता पोस्ट शेअर करत लिहिले आहे की, “प्रत्येकाने पाहायला हवा. मी सध्या दुसऱ्या सिनेमामध्ये व्यस्त असल्याने मला अजून हा चित्रपट बघणं जमलं नाही. पुढील दोन दिवसांत मी चित्रपट बघून एक छान व्हिडीओ प्रसारित करणार आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे खूप लोक मला विचारत आहेत की तुम्ही अजून या चित्रपटाबद्दल अजून काहीच का बोलला नाहीत. त्यामुळे आधी चित्रपट पाहावा आणि मग त्यावर सविस्तर बोलावं असं मी ठरवलं आहे. पुढील चार दिवसांत माझा व्हिडीओ येईल”.
त्यांच्या या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे ते नक्की काय बोलणार याबद्दल सर्वांची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान हा चित्रपट प्रदर्शित होऊन एक दिवस झाला असून सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने पहिल्या दिवशी १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शनिवार व रविवारच्या दिवशी हा चित्रपट चांगली कमाई करेल असे सांगण्यात येत आहे.
या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी सुमारे २० ते २५ कोटी रुपये खर्च आला आहे. या चित्रपटासाठी रणदीपने स्वतःचे घरदेखील विकल्याचे सांगितले होत. या चित्रपटाच्या निमित्ताने रणदीपने पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तसेच या चित्रपटासाठी रणदीपने खूप मेहनत घेतली असल्याचेही दिसून आले आहे. या भूमिकेसाठी रणदीपने तब्बल २६ किलो वजन कमी केले आहे. त्याच्या या मेहनतीचे त्याच्या चाहत्यांनी खूप कौतुक केले आहे.