झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका दिवसेंदिवस प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. मालिकेचे रहस्यमय कथानक व मालिकेत येणारे रोजचे नवनवीन ट्विस्ट् या मालिकेची प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढवत आहेत. अशातच मालिकेत नुकताच एक नवीन ट्विस्ट आला असून या ट्विस्टमुळे चाहत्यांचा हिरमोड झाला असल्याचे पाहायला मिळत आहे.
नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या प्रोमोमध्ये अस्तिका ही नेत्राच्या रूपात आली असल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे अद्वैतसह सगळेच गोंधळात पडले आहेत. अस्तिका स्वत:ला नेत्रा समजत आहे, तसेच ती सर्वांना मी अस्तिका नाही तर नेत्रा असल्याचे सांगत आहे. यानंतर अस्तिका स्वत:ला आरशात पाहते तेव्हा तिलाही ती नेत्रा नसल्याचे कळते आणि त्यामुळे स्वत:चा खरा चेहरा बघून तिचाही गोंधळ उडतो.
याच नवीन प्रोमोखाली नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स करत त्यांना हा नवीन ट्विस्ट आवडला नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नेटकऱ्यांनी या प्रोमोखाली एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “याला पूर्णपणे फालतूपणा म्हणतात, एकेकाळी ही माझी आवडती मालिका होती, पण आत्ता ही माझी नावडती मालिका झाली आहे” तर आणखी एकाने “मालिका इतकी इतकी चांगली चालू असताना मध्येच हे नवीन करण्याची काय गरज होती” असं म्हटलं आहे.

तसेच अनेकांनी “नेत्राने म्हणजेच तितीक्षा तावडेने तिच्या लग्नासाठी सुट्टी घेतली आहे म्हणून हे असं काहीतरी दाखवत आहेत, लग्न झाल्यामुळे नेत्राने मालिका सोडली आहे का?, आता ही मालिका रटाळ झाली आहे, हे काही पटत नाहीये, आता या मालिकेचा वैताग यायला लागला आहे, कृपया काहीही दाखवू नका” अशा कमेंट्स करत मालिकेतील या नवीन ट्विस्टवर नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आता या मालिकेत पुढे आणखी नवीन काय पाहायला मिळणार यांचीही प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे.