छोट्या पडद्यावरील ‘द कपिल शर्मा शो’ या विनोदी कार्यक्रमामधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे कृष्णा अभिषेक. आपल्या विनोदाचं अचूक टायमिंग, उत्तम विनोदी अभिनय तसेच नक्कल करण्याच्या अनोख्या शैलीमुळे कृष्णाने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली आहे. कृष्णा हा बलिवूड अभिनेता गोविंदा यांचा भाचा असून या मामा-भाच्यात कायमच दुरावा असल्याचे पाहायला मिळाले आहे. पण तो गोविंदाचा भाचा असल्यामुळेच अनेकजण त्याला चित्रपटांत घेण्यास उत्सुक असतात असा खुलासा केला आहे.
विनोदी अभिनेत्री भारती सिंगच्या भारती टीव्ही या मुलाखतीच्या कार्यक्रमात कृष्णाने त्याच्या चित्रपट व टीव्ही क्षेत्रातील प्रवासाविषयी सांगितले. तसेच यावेळी त्याने चित्रपट व विनोदी कार्यक्रमांसाठी घेत असलेल्या मानधनाविषयी आणि तो गोविंदाचा भाचा असल्यामुळे त्याला लोक चित्रपटांत घेऊ इच्छितात याबद्दल खुलासा केला आहे.
यावेळी कृष्णा असं म्हणाला की, “मी केवळ पैशासाठी ‘कॉमेडी सर्कस’ हा कार्यक्रम केला होता आणि या शोमुळे मी खूप खुश होतो. ते मला प्रत्येक भागाचे दीड लाख रुपये देत होते. त्यामुळे मी दररोज ३ लाख रुपये कमवू शकलो. तसेच मी गोविंदाचा भाचा असल्यामुळे त्यांनी मला कायमच आदरपूर्वक वागणूक दिली”.
यापुढे कृष्णाने त्याच्या भोजपुरी चित्रपटांत काम करण्याविषयी असे म्हटले की, “त्यावेळी मी भोजपुरी चित्रपट करत होतो आणि मला प्रत्येक चित्रपटासाठी ३ लाख रुपये मिळायचे. भोजपुरी चित्रपटातील माझ्या कामाचा मला खूप अभिमान आहे, कारण मला तेव्हा त्या चित्रपटामधील काही सीन्स कळत नव्हते पण ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले”.
दरम्यान, कृष्णा अभिषेक लवकरच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर येणाऱ्या या शोमध्ये कपिल शर्मा व सुनील ग्रोव्हर पुन्हा एकत्र दिसणार आहेत, तर यांच्यासह अर्चना पूरण सिंग, किकू शारदा, राजीव ठाकूर हेदेखील या शोमध्ये असणार आहेत. नुकताच या शोचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.