सिनेसृष्टीत सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहताना पाहायला मिळत आहेत. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्याने त्याच्या प्रेमाची जाहीर कबुली देत साऱ्यांना सुखद धक्का दिला. हा अभिनेता म्हणजे प्रथमेश परब. काही दिवसांपासून प्रथमेशच्या लग्नाची चर्चा सुरु होती. दरम्यान प्रथमेश व तिच्या होणाऱ्या बायकोने त्यांच्या लग्नाबाबतची गुडन्यूज चाहत्यांसह शेअर केली. लवकरच ही जोडी विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळणार आहे. नुकताच प्रथमेश व क्षितिजा यांचा साखरपुडा समारंभ पार पडला. (Prathamesh Parab Kshitija Ghosalkar Engagement)
अभिनेत्याच्या घरी लगीनघाई सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. ठरल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रथमेश परब व त्याची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकर यांनी एक नवी सुरुवात केली. या दोघांचा साखरपुडा थाटामाटात पार पडला असून या सोहळ्यातील साधेपणाने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. “आमचा व्हॅलेंटाईन डे असा साजरा झाला…इथून पुढे आयुष्यभराची साथ राहील” असं कॅप्शन देत प्रथमेशने साखरपपुड्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले.प्रथमेश व क्षितिजा यांच्या साखरपुडा समारंभातील अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
साखरपुड्यासाठी अभिनेत्याने पांढऱ्या रंगाची शेरवानी, तर क्षितिजाने जांभळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली होती. कोणताच अवाढव्य खर्च व महागडे कपडे परिधान न करता दोघांनी अत्यंत साधेपणाने त्यांचा हा समारंभ उरकला. अभिनेत्याच्या होणाऱ्या बायकोने यावेळी पारंपरिक काठापदराची साडी नेसलेली पाहायला मिळाली, त्यामुळे तिच्या या साध्या लूकचं ही सर्वत्र कौतुक होत आहे. याशिवाय प्रथमेश व क्षितिजा यांचा मॉडर्न अंदाजही विशेष भावला. अभिनेत्याने यावेळी गुलाबी रंगाचे ब्लेझर परिधान केले होते तर क्षितिजा गुलाबी रंगाच्या साध्या सिंम्पल गाऊनमध्ये खूप सुंदर दिसत होती.
साखरपुड्यानंतर आता ही जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या २४ फेब्रुवारीला प्रथमेश व क्षितिजा यांचा शाही विवाहसोहळा उरकणार असल्याचं त्यांनी सोशल मीडियावरुन सांगितलं आहे. त्यामुळे आता साखरपुड्यानंतर आता त्यांच्या लग्नसोहळ्यासाठी चाहते उत्सुक असल्याचं पाहायला मिळत आहे.