प्रसिद्ध गायक आदित्य नारायण हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे . काही दिवसांपूर्वी त्याच्या एका कॉन्सर्टमधील चाहत्याशी गैरवर्तन करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या प्रकारामुळे आदित्यवर अनेक स्तरातून टीका होत आहे. छत्तीसगढमधील आयोजित केलेल्या कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याच्या हातावर मारत त्याने त्याचा फोन फेकून दिला. हा व्हिडीओ व्हायरल होताच कॉन्सर्ट मॅनेजरने या संदर्भात स्पष्टीकरण दिले. (Aditya narayan on concert)
या स्पष्टीकरणामध्ये आयोजकांनी सांगितले की, “आदित्यचा लाईव्ह कॉन्सर्ट सुरु असताना प्रेक्षकांमधील एक व्यक्ती सतत आदित्यच्या पायावर फोनने मारत होता आणि त्याचे पाय खेचत होता. या कृतीमुळे आदित्यला राग अनावर झाला व त्याने त्या व्यक्तीचा फोन घेऊन भिरकावला.” आदित्यच्या हातून हे कृत्य रागाच्या भरात झाले असेदेखील मॅनेजरने सांगितले. मॅनेजरच्या या स्पष्टीकरणानंतर आता आदित्यने स्वतः याबाबत मौन सोडले आहे.
लाईव्ह कॉन्सर्टमध्ये झालेल्या सर्व प्रकारामुळे आदित्यला अनेक टीकांचा सामना करावा लागत आहे. या सर्व घटनेवर प्रतिक्रिया देताना आदित्य म्हणाला की, “खरं सांगू तर मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, उत्तर द्यायचेच असेल तर मी ते देवाला देईन”, असे त्याने सांगितले. त्याच्या या प्रतिक्रियेने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आदित्यच्या या कॉन्सर्टमध्ये महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी सहभागी होते.
छत्तीसगढच्या भिलाईमधील रुंगटा या महाविद्यालायात आदित्यचा लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. आदित्यच्या चाहत्यांनी या कॉन्सर्टला प्रचंड गर्दी केली होती. या गर्दीमध्ये जो व्यक्ती स्टेजच्या जवळ उभा होता त्याने आदित्यचे पाय खेचण्याचे प्रयत्न केले व त्याच्या पायावर मोबाईलने मारले. यावर आदित्यने रागाच्या भरात त्या व्यक्तीचा फोन फेकून दिला. पण आयोजकांच्या म्हणण्यानुसार तो सदर व्यक्ती जर त्या महाविद्यालायाचा होता तर आदित्यबद्दल तशी तकार करणे गरजेचे होते. पण त्या व्यक्तीने तसे काही केले नाही, असे देखील आयोजकांनी सांगितले.
घडलेल्या सदर प्रकारानंतर आदित्यचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर नियमित सक्रिय असणाऱ्या आदित्यने त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट प्रायव्हेट केले. यामुळे आदित्यच्या कृतीवर अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत.