गेल्या अनेक दिवसांपासून सर्वत्र ‘बिग बॉस १७’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ‘बिग बॉस १७’ मधील अनेक ट्विस्ट्समुळे या शोची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. आज (२८ जानेवारी) रोजी ‘बिग बॉस १७’चा महाअंतिम सोहळा पार पडत असून आज या पर्वाचा महाविजेता ठरणार आहे. अशातच घरातील मनारा चोप्राचा प्रवास संपला आहे.
‘बिग बॉस’च्या घरात मनारा चोप्राचा प्रवास सुरुवातीपासूनच खूप रंजक ठरला आहे. घरात आल्यापासूनच तिने सगळ्यांच्या मनावर राज्य केले. मनारा ही सुरुवातीपासूनच घरात सर्वात चांगली कामगिरी पार पाडत होती. घरातील प्रत्येक खेळ मोठ्या शिताफीने खेळत तिने घरातील स्पर्धकांसह प्रेक्षकांनादेखील स्वत:कडे आकर्षित केले. पण ‘बिग बॉस’च्या या अंतिम टप्प्यावर तिचा प्रवास अखेर संपला आहे.
मनारा बाहेर गेल्यामुळे घरात आता फक्त मुनव्वर फारुकी व अभिषेक कुमार हे दोन स्पर्धक उरले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी ‘बिग बॉस १७’चा विजेता घोषित केला जाणार आहे. मनाराच्या आधी या घरातून नुकतेच अरुण माशेट्टी व अंकिता लोखंडे हे दोन स्पर्धक बाहेर पडले.
मुनव्वर व अभिषेक दोघेही घरातील तगडे स्पर्धक आहेत. त्यामुळे आता कोण जिंकेल? याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. दोघांचेही जबरदस्त चाहते आहेत. त्यामुळे त्यांना खूप चांगला प्रतिसाददेखील मिळाला आहे. त्यामुळे ‘बिग बॉस’च्या १७च्या विजेते पदाचा मानकरी कोण ठरणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.