मराठी सिनेसृष्टीसह हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची दाखल घ्यायला भाग पाडणारा अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. जितेंद्र त्याच्या दमदार अभिनय कौशल्यामुळे कायमच चर्चेत असतो. जितेंद्र हा एक उत्तम अभिनेताच नव्हे तर उत्तम कवीदेखील आहे. त्याचबरोबर तो समाजभानही जपतो. समाजात घडणाऱ्या अनेक विषयांवर तो कवितेच्या किंवा लेखणीच्या माध्यमातून भाष्य करत असतो. अनेकदा त्याने त्याची मते परखडपणे व्यक्त केली आहेत. अशातच त्याने इन्स्टाग्रामद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टने सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. (Jitendra Joshi On Instagram)
जितेंद्रने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने असं म्हटलं आहे की, “महामार्ग निर्माण करताना झाडाची कत्तल करणाऱ्या लोकांना आपल्या पुढच्या पिढ्या गुदमरताना दिसत नाहीत. झाडांची अमानुष हत्या होऊ देणारे आपणसुद्धा निर्वंश मारून टाकले जाणार आहोत. आत्ताच आपापल्यासाठी डांबर तयार ठेवू त्याच रस्त्यांखाली झाडांच्या मृतदेहाबरोबर झोपी जाण्यासाठी”. जितेंद्र जोशीची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होत आहे. पण त्याने ही पोस्ट कशाबद्दल आणि कोणाबद्दल केली आहे, याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. अभिनेत्याने स्वत: कसलाही संदर्भ देत ही पोस्ट शेअर न केल्यामुळे या पोस्टवरुन सोशल मीडियावर अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. त्यामुळे ही पोस्ट नक्की कशासंदर्भात आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जितेंद्र हा अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी होत असतो. त्याने आमिर खानचच्या पाणी फाऊंडेशनमध्ये सहभागी होत श्रमदान केले आहे. त्याचबरोबर ‘नाम’सारख्या संस्थेमध्येही काम केले आहे. त्याच्या मुलाखतीमधून अनेकदा निसर्गाविषयी असलेले प्रेम व्यक्त केले आहे. अशातच निसर्ग व झाडे तोडून बनवल्या जाणाऱ्या बनवल्या जाणाऱ्या महामार्गांवर त्याने ही पोस्ट केली आहे. त्यामुळे सध्या त्याची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
आणखी वाचा – लग्नानंतर प्रसाद जवादेची छोट्या पडद्यावर एण्ट्री, मालिकेचा प्रोमो समोर, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘नाळ २’ या चित्रपटात जितेंद्रने एक महत्त्वपूर्ण भूमिका केली होती. त्याच्या या भूमिकेला व चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला होता. यानंतर आता तो कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत. त्याच्या नवीन कामाची अनेकांना उत्सुकता लागली आहे.