‘होणार सून मी या घरची’ मालिकेतून अभिनेता रोहन गुजर घराघरांत पोहोचला. त्याची मालिकेतील जान्हवीच्या भावाची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली. याशिवाय रोहन बऱ्याच मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असतो. अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करता करता रोहन बोहोल्यावर चढला. १४ वर्षांपूर्वीच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात करत त्याने स्नेहल गुजरसह लगीनगाठ बांधली. (Rohan Gujar Wife)
रोहन व स्नेहल नेहमीच सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. काही ना काही शेअर करून ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. अशातच अभिनेत्याच्या पत्नीने केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्नेहल सध्या एका मोठया आजाराशी लढा देत असल्याचं तिच्या पोस्टवरून समोर आलं आहे. स्नेहलने इंस्टाग्राम अकाऊंटवरून याबाबतची पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. सुरुवातीला स्नेहलने एक पोस्ट शेअर केली होती, यांत तिने “आपल्या न कळत उगाच वाटत असतं, गोष्टी कशा आपल्या ताब्यात आहेत. आपलं सबंध आयुष्य कसं ताब्यात आहे. गेली ३ वर्ष सतत धावणं होतं आहे, नो ब्रेक लाईफ पॅटर्न मोडण्यासाठी आयुष्यालाच झुकाव लागलं” अशा विचार करायला लावणाऱ्या असायची पोस्ट तिने शेअर केली होती.
त्यानंतर स्नेहलने दुसरी पोस्ट शेअर करत आयुष्याला नेमकं का झुकावं लागला याचा खुलासा केला. स्नेहलने पोस्ट शेअर करत म्हटलं, “ऑगस्ट महिन्यात छातीत डाव्या बाजूला दुखणं सुरु झालं. हे दुखणं नवीन होतं. आधी कधीही अनुभवलं नव्हतं. पाठपुरावा करायचं ठरवलं आणि किचकट आजार सरप्राईज म्हणून समोर आला. ‘स्टेज झिरो कॅन्सर’ (Ductal carcinoma in situ). कॅन्सरच्या आधीची स्टेज. या आजाराने मला पूर्ण पकड्ण्याधीच मी त्याला एक टप्पा आऊट करू शकले याचं समाधान आहे. संपूर्ण प्रक्रियेत मेंटल, इमोशनल ब्रेक डाऊनचे अनेक प्रसंग येतात. मला डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा व सर्जरीनंतर पहिल्यांदा जखम पाहिली तेव्हा डोळ्यांना थांबवता आलं नाही” असंही ती भावुकतेने म्हणाली.
यापुढे स्नेहलने लिहिलंय, “गोष्टी अजून सोप्या होतात जेव्हा तुमचं कुटुंब तुमच्याबरोबर खंबीरपणे उभं राहतं. या बाबतीत माहेर व सासर दोन्ही कुटुंबांना १०० गुण. कोणताच ड्रामा नाही, साध्या सोप्या पद्धतीने आहे ते स्वीकारलं आणि वातावरण पूर्णपणे नॅार्मल ठेवलं. दसरा ते दिवाळी या १५ दिवसांत शरीरातून ही कॅन्सरची नकारात्मकता काढून टाकली आहे. यंदा दिवाळीत योगायोगाने खूप दिवे गिफ्ट मिळाले. मी ते ‘तिमिरातून तेजाकडे’ याचं प्रतिक मानलेत”, अशी पोस्ट लिहीत स्नेहलने तिच्या या लढ्यातील प्रवास सांगितला. स्नेहलच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट करत तिला खंबीर राहण्यास सांगितलं आहे.