सार्वजनिक वाहनांचा वापर करताना किंवा विमानप्रवास करताना अनेकांना विविध अनुभव येतात. काहींचा प्रवास सुखकर होतो. तर काहींना यादरम्यान बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. सेलिब्रिटी मंडळींनाही हे काही चुकलं नाही. बऱ्याचदा विमानप्रवास करत असताना कलाकारांना विविध प्रसंगांना तोंड द्यावं लागतं. कधी फ्लाइट वेळेवर नसल्यामुळे गोंधळ उडतो तर कधी सामानही उशीराने मिळतं. असंच काहीसं अभिनेता जितेंद्र जोशीबाबत घडलं आहे. कामानिमित्त विमान प्रवास करत असताना त्याला आलेला अनुभव जितेंद्रने सगळ्यांबरोबर शेअर केला आहे.
जितेंद्रला विमान प्रवासादरम्यान आलेल्या अनुभवाबाबत त्याने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे संतप्त पोस्ट शेअर केली आहे. त्याची फ्लाइट उशीराने आली. त्यामुळे जितेंद्रचा राग अनावर झाला. अशामध्ये त्याने विमानत बसलेला एक फोटो शेअर केला. तसेच त्या संबंधित विमान कंपनीला टॅगही केलं. फ्लाइट उशीरा येऊनही कंपनीने प्रवाशांची माफी मागितली नसल्याची तक्रारही जितेंद्रने केली.
जितेंद्र म्हणाला, “खूप वाईट. तुम्ही तुमची प्रतिष्ठा आणि आदर गमावला आहे. ९० मिनिटांपेक्षा अधिक वेळ तुमची विमानं उशीराने उड्डाण करत आहेत. तुम्ही याबाबत प्रवाशांची साधी माफीही मागितली नाही”. नावाजलेल्या विमान कंपनीला त्याने टॅगही केलं आहे. इंडिगो विमान कंपनीबाबत जितेंद्रला हा अनुभव आला आहे. जितेंद्रच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

जितेंद्रबरोबरच याआधी अनेक कलाकार मंडळींना या परिस्थितीचा सामना करावा लागला होता. काही कलाकारांना तर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचं सामानही मिळालं नाही. अशा बऱ्याच तक्रारी कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सगळ्यांपर्यंत पोहोचवल्या. आता जितेंद्रच्या या पोस्टनंतर इंडिगो विमान कंपनी प्रवाशांची माफी मागणार का? हे पाहावं लागेल.