आपल्या नृत्यशैलीने अभिनेत्री मानसी नाईकने आजवर अनेकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. नेहमीच ती अनेक रील्स, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. याशिवाय ती तिच्या खासगी आयुष्यामुळेही कायम चर्चेत असते. मानसी लवकरच तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार आहे. मानसीने प्रदिप खरेराबरोबर १९ जानेवारी २०२१ रोजी लगीनगाठ बांधली. लग्नाआधी ते काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. लग्नानंतरच्या त्यांच्यातील वादानंतर दोघांनीही इन्स्टाग्रामवरून एकमेकांबरोबरचे फोटो डिलीट केले. (Manasi Naik On Divorce)
काल मानसीने करवा चौथनिमित्त एक पोस्ट शेअर केली, या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. शिवाय या पोस्टची चांगलीच चर्चाही रंगली. मानसीने करवा चौथनिमित्त एक व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर केला आहे. यांत मानसीने लाल रंगाची साडी नेसली असून ती नटून थटून ‘चाँद छुपा बादल में’ या गाण्यावर थिरकताना दिसतेय. करवा चौथनिमित्त शेअर केलेला हा तिचा व्हिडीओ “तु्म्हारे और तुम्हारे जीवनसाथ का साथी कभी ना छूटे, खुशियों और हंसी से तुम्हारा घर आंगन महके, करवा चौथ की बधाइयां” असं कॅप्शन देत शेअर केला आहे. घटस्फोटानंतर करवा चौथ साजरी केल्याने मानसी नेटकऱ्यांच्या चांगलीच तावडीत अडकली आहे. दरम्यान यावरून अनेक बातम्याही सोशल मीडियावरून व्हायरल झाल्या. आता मात्र या बातम्यांवरून अभिनेत्रीने तिचं स्पष्ट मत व्यक्त करत करवा चौथचा खुलासा केला आहे.

इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक स्टोरी पोस्ट करत मानसी म्हणाली, “मी विभक्त होण्याच्या प्रक्रियेत आहे हे सर्वांना माहित आहे, याबद्दल मी जागरूक आहे. याचा अर्थ असा नाही की, भावनिक वा पारंपरिक दृष्टिकोनातून येणारे प्रोजेक्ट मी स्वीकारू नयेत! मी एक कलाकार आहे आणि हो मला पारंपरिक मूल्यांचे पालन व आदर करायला आवडतं. आता तुम्हाला माहित नसलेली बाजू म्हणजे, मी करवा चौथचं शूट करत होते आणि मी लग्नानंतरचा माझा पहिला करवा चौथ एकटीने दुसरीकडे कुठेही साजरा न करता मुंबईत साजरा केला. कोणत्याही नव्या नवरीला वाईट वाटणारी ही गोष्ट आहे, पण हेच कटू सत्य आहे.”
मानसीने तिच्या करवा चौथबद्दल चुकीची माहिती माध्यमांमध्ये समोर आल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे. तिने हे रिपोर्ट्स दुरस्त करण्याचीही विनंती केली आहे. पुढे ती म्हणाली, “माझ्या वैयक्तिक आयुष्याच्या अशा खडतर प्रवासानंतरही मी काम करत आहे याचा मला आनंद वाटतो, माझ्या कुटुंबीयांनी, प्रेक्षकांनी आणि माझ्या मीडियाने माझ्यावर प्रेम केले आणि मला भावनिक पाठिंबा दिला याबद्दल मी खरोखर आभारी व कृतज्ञ आहे. करवा चौथच्या शुभेच्छा.”