Actor Rio Kapadia Died at 66 : गेल्या काही दिवसांपासून कलाक्षेत्रामधून काही दुःखद घटना समोर येत आहेत. आता आणखी एका कलाकाराचं निधन झालं असल्याची बातमी समोर आली आहे. ‘दिल चाहता है’ फेम अभिनेता रिओ कपाडियचं निधन झालं आहे. तो ६६ वर्षांचा होता. रिओचं निधन कशामुळे झालं याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. पण या घटनेनंतर संपूर्ण बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये काम करणाऱ्या रिओच्या निधनानंतर त्याचे चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत.
रिओ कर्करोगामुळे त्रस्त होता. त्याची या रोगाशी सुरु असलेली झुंज अखेरीस अपयशी ठरली आहे. रिओचा जवळचा मित्र फैजल मलिक यांनी सांगितलं की, “आता आपल्यामध्ये रिओ कपाडिया नाही आहे हे सांगण्यास अत्यंत दुःख होत आहे. आज १२.३० वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी (१५ सप्टेंबर) रिओच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येतील. रिओच्या कुटुंबियांकडून अंतिम संस्काराबाबत अधिकृत माहिती देण्यात आली आहे”.
आणखी वाचा – ‘या’ दिवशी परिणीती चोप्रा व राघव चड्ढा विवाहबंधनात अडकणार, लग्नपत्रिकाही आली समोर
गोरेगाव येथील स्मशानभूमीमध्ये रिओ यांच्या पार्थिवावर सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५ जूनला रिओची शेवटची पोस्ट आहे. त्याने त्याच्या व्हॅकेशनचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले होते. कुटुंबियांबरोबर तो युरोप ट्रीपवर गेला होता. तिथे त्याने कुटुंबियांसह बरीच धमाल-मस्तीही केली. विशेष म्हणजे तो त्याच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यायचा. रिओच्या निधनानंतर सगळ्यांनाच दुःखद धक्का बसला आहे.
दिल चाहता है, चक दे इंडिया, हॅप्पी न्यू इयर सारख्या चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत रिओने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ‘मेड इन हेवन २’ वेबसीरिजमध्येही त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. रिओच्या निधनानंतर सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाविश्वातील मंडळी श्रद्धांजली वाहत आहेत.