Marathi Serial Viral Video : कलाकार मंडळी प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी नेहमीच अभिनयात विविधांगी बदल घडवत असतात. प्रेक्षकांच्या प्रेमापोटी ही मंडळी अहोरात्र मेहनत घेत असतात. घरापासून, कुटुंबापासून दूर राहत, वेळ-काळ, पाऊस-वारा न पाहता ही कलाकार मंडळी अभिनयात बरीच मेहनत घेताना दिसतात. कित्येकदा तर कथानकात अनेक ट्विस्ट येत असतात, दरम्यान, अपघाताचे, ऍक्शन सीन आल्यावर त्यांची तारेवरची कसरत असते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. आम्हा प्रेक्षकांना हे अपघाती सीन पाहताना अंगावर जितके काटे येतात त्याहून दुप्पट मेहनत कलाकार आणि संपूर्ण टीम घेत असते. प्रत्येक गोष्टीची सुरक्षा घेत जरी हे सीन शूट होत असले तरी ते नीट होतील ना ही धाकधूक नेहमीच प्रत्येक कलाकाराला लागून राहिलेली असते.
हे सगळं बोलण्यामागचं कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर एका मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केलेला व्हिडीओ आहे. हो. लाखात एक आमचा दादा या मालिकेतील शालन ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री सुमेधा दातार हिने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली. शालनचा मालिकेत अपघात दाखविण्यात आला यावेळी अपघाताचा सीन शूट करण्यापूर्वी त्या कलाकाराच्या अंगावरुन एक श्रीफळ ओवाळून दूर टाकण्यात आलं. यावेळी त्यांना कोणतीही बाधा होऊ नये, त्यांना नजर लागू नये म्हणून त्यांची टीमकडून, प्रॉडक्शन हाऊसकडून काळजी घेतली जाते. अर्थात हे प्रत्येकाच्या मानण्यावर असले तरी ही चांगली पद्धत सर्वांपर्यंत पोहचावी या अनुषंगाने त्या अभिनेत्रीने व्हिडीओ शेअर केला आणि नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शविली.
सुमेधा यांनी हा व्हिडीओ शेअर करत लिहिलं की, “सेटवर कधी accident किंवा death sequence शूट केला तर त्यानंतर त्या आर्टिस्टवरुन तीन वेळा श्रीफळ ओवाळून टाकून त्याची दृष्ट काढली जावी. या अशा काळजी घेण्याच्या भावनेमुळे सगळ्यांचे आभार. काल स्टोरी पोस्ट केल्यावर अनेकांचे रिप्लाय आले. सगळीकडे हे केलं जात नाही अशी तक्रारपण अनेकांनी केली. खूपदा असं काही करायचं असतं हे माहितीच नसतं. पण एक चांगली पद्धत म्हणून आपण याचा नक्कीच स्वीकार करु शकतो, अर्थात हे प्रत्येकाच्या मानण्यावर आहे. पण जास्तीत जास्त लोकांना हे माहिती व्हावं म्हणून रील शेअर करत आहे”.
मालिकेतून आता सुमेधा यांची म्हणजेच शालन यांची एक्झिट होणार आहे. याबाबतही त्यांनीच भावुक पोस्ट केलेली दिसली, त्यांनी मालिकेतील सीनदरम्यानचा व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाला सोहळा अनुपम्य, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी स्मरल्या. शालनच्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, सहकार्य केलं, प्रेम-आपुलकी दिली त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. शालन कथेत संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. स्नेह आहेच, तो वृद्धिंगत व्हावा. मुद्दाम कोणतंही bgm टाकलेलं नाही”.





