Shashank Ketkar Video : मढ-आयलँड येथील रस्त्यावरचा एक व्हिडीओ शेअर करत अभिनेता शशांक केतकरने (Shashank Ketkar) आवाज उठविला. मढ-आयलँड येथील रस्त्यावर असणाऱ्या दोन झाडांना कोणतंच रिफ्लेक्टर लावण्यात आलेलं नव्हतं. इतकंच नाही तर ही झाड ना धड रस्त्याच्या कडेला होती ना मधोमध होती. आणि मुसळधार पावसात रात्रीच्या वेळी तर ही झाड रिफ्लेक्टर नसल्याने दिसेनाशी व्हायची, याने अपघाताची दाट शक्यता होती. आणि म्हणूनच शशांकने थेट व्हिडीओ शेअर करत या प्रकरणावर आवाज उठविला होता. यानंतर आता शशांकने आणखी एक पोस्ट शेअर करत केलेल्या तक्रारीच निरसन झाले असल्याचं म्हटलं आहे. सध्या त्याची ही पोस्ट अधिकच व्हायरल होत चालली आहे.
शशांकने व्हिडीओ शेअर करत असं म्हटलं की, “आपण आवाज उठवला, योग्य प्रकारे तक्रार केली तर त्याकडे लक्ष दिलं जातं. मी परवा तक्रार केली होती आणि आज त्यावर ऍक्शन घेत माझ्या तक्रारीकडे लक्ष देण्यात आलं. याची सुरुवात झाली आहे असं मला वाटतं. दोन्ही झाडांना त्यातल्या त्यात का होईना असे रिफ्लेक्टर लावण्यात आले आहेत. आणि मला खात्री आहे की या झाडांना चांगले रिफ्लेक्टरही लावले जातील किंवा या झाडांचा काय तो सोक्षमोक्ष लावला जाईल. बोलत रहा आपला देश आहे आणि आपला देश आपणच सुधारु शकतो”, असं म्हणत त्याने महानगरपालिका आणि स्थानिक आमदाराचे आभार मानले आहेत.
या व्हिडीओखाली कॅप्शन देत त्याने असं म्हटलं की, “सरकार कोणाचेही असो, आपण सामान्य या भारताचे नागरिक आहोत आणि चांगल्या वाईट गोष्टींसकट आपल्याला इथेच राहायचे आहे. तेव्हा बोला. जे आत्ता किंवा त्या त्या वेळी सरकारमध्ये असतील त्यांनी आपली दखल घेणं आणि ऍक्शन घेणं ही त्यांची जबाबदारी आहे. आणि सोयी पुरवल्यावर त्या नीट वापरणं ही आपली जबाबदारी आहे. पण, बोला. आवाज उठवा. तक्रार नोंदवा. (व्हिडीओ शूट करुन तक्रार नोंदवणे हा मार्ग योग्य की अयोग्य यावर चर्चा होऊ शकते पण काहीतरी करा) तुम्हाला काय वाटतं?”.
आणखी वाचा – “आम्हाला मरायची इच्छा नाही”, मढ-आयलँडमधील रस्त्याबाबत भडकला शशांक केतकर, म्हणाला, “निष्काळजीपणा आणि…”
यापूर्वी शशांकने व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त करत म्हटलं होतं की, “आम्हाला मरायची इच्छा नाही. तुम्हाला आमची काळजी नसेल तरी आम्हाला आमची काळजी आहे. त्यामुळे दोन रिफ्लेक्टर मागवा आणि ते या झाडाला लावा किंवा या झाडांच काहीतरी करा. कारण ही झाडे रस्त्याच्या मध्येही नाहीत किंवा बाजूलाही नाहीत. त्यात या झाडांना रिफ्लेक्टर सुद्धा नाही”.





