‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ही मालिका प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. तसेच मालिकेतील कलाकारांच्या अभिनयानेही प्रेक्षक जोडले गेले आहेत. मालिकेच्या रंजक कथानकाने या मालिकेला खऱ्या अर्थाने पसंती मिळाली आहे. या मालिकेत त्रिनयना देवीचे गूढ रहस्य दाखवण्यात आले आहे. मालिकेत नेत्रा-अद्वैतचा प्रवासही पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तितीक्षा तावडे व अभिनेता अजिंक्य ननावरे ही कलाकार मंडळी मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. (Satvya Mulichi Satvi Mulgi Serial Troll)
नुकताच ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेने ५०० भागांचा टप्पा गाठला. या खास क्षणाच जंगी सेलिब्रेशन मालिकेच्या टीमकडून करण्यात आलं. यावेळी दोन मोठे केक कापून मालिकेच्या टीमने हा खास क्षण साजरा केला. यावेळी सगळ्या टीमला खास भेटवस्तूही देण्यात आली. दरम्यान या सेलिब्रेशनवेळी प्रेक्षकांना एक गोष्ट खटकलेली दिसली. सेलिब्रेशनचे काही खास फोटो त्यांनी झी मराठी वाहिनीच्या ऑफिशिअल इंस्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट केले होते. सेलिब्रेशनच्या केकवर देवीचा फोटो होता. हा फोटो पाहून एका युजरने आक्षेप घेतला. युजरच्या या प्रश्नाला ‘झी मराठी’ वाहिनीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
केकच्या फोटोवर त्रिनयना देवीचा फोटो दिसताच त्याच पोस्टवर एका युजरने कमेंट करत म्हटलं की, “देवीचा फोटो असलेला केक कापणार का?”, यावर ‘झी मराठी’ वाहिनीकडून स्पष्टीकरण देत सांगण्यात आलं की, “केकचा तो भाग बाजूला काढून ठेवला होता. त्रिनयना देवी या मालिकेचा मूळ गाभा आहे. हे रहस्य तिने योजलेलं आहे. त्यामुळे सगळ्या क्रिएटीव्हवर तिची प्रतिमा असतेच”. तर अनेकांनी या कमेंटवर तो मालिकेचा एक भाग असल्याचं म्हणत मालिकेची, व ‘झी मराठी’ वाहिनीची बाजू घेतली आहे.

२०२२ पासून ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेच्या रहस्यमय कथानकाने साऱ्यांना भुरळ घातली आहे. मालिकेत तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे, राहुल मेहेंदळे, ऐश्वर्या नारकर, श्वेता मेहेंदळे या कलाकारांचा अभिनय पाहणं रंजक ठरतंय.