सोशल मीडियावर सध्या चर्चा रंगली आहे ती म्हणजे गुलाबी साडीची. गुलाबी साडी हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून प्रत्येकाच्या मनावर राज्य करत आहे. लहानग्यांपासून ते अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेकांना या गाण्याची भुरळ पडली. अनेकजण या गाण्यावर रडताना दिसले. अगदी मराठी कलाकारांनाही या गाण्यावर थिरकतानाचा मोह आवरला नाही. अशातच मराठी सिनेसृष्टीतील एक लोप्रिय जोडपं म्हणजेच अभिनेता उमेश कामत व अभिनेत्री प्रिया बापट यांनाही या गाण्यावर थिरकतानाचा मोह आवरला नाही. (Priya Bapat And Umesh Kamat On Gulabi Sadi)
सिनेसृष्टीत प्रिया व उमेश ही जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. सोशल मीडियावरही ही जोडी नेहमीच बऱ्यापैकी सक्रिय असते. काही ना काही शेअर करत ही जोडी चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या प्रिया व उमेश नाटकविश्वात व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. दोघांच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. अशातच आता दोघांनी गुलाबी साडी या गाण्यावर केलेला डान्स साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
गुलाबी साडी या गाण्यावर जरी प्रिया व उमेश थिरकले असले तरी या गणयवर थिरकण्यासाठी एक खास कारण असल्याचं समोर आलं आहे. प्रिया-उमेशच्या सध्या सुरु असलेल्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाला प्रेक्षकांकडून हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळत असून लवकरच याचा शंभरावा प्रयोग पार पडणार आहे. “येत्या ७ एप्रिलला आमच्या ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचा शंभरावा प्रयोग असल्याने आमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे” असं कॅप्शन देत प्रियाने हा डान्स केला आहे. यावेळी दोघांनी गुलाबी रंगाचे पारंपरिक कपडे परिधान केले होते.
प्रिया व उमेशच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत दोघांचं भरभरून कौतुक केलं आहे. इतकंच नव्हेतर चाहत्यांसह कलाकार मंडळींनीही दोघांच्या सुंदर अशा डान्सच कौतुक केलं आहे. प्रिया-उमेशचा हा गुलाबी साडी गाण्यासाठीचा लूक आणि त्यांचा डान्स लक्षवेधी ठरत आहे.