बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा हा त्याच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटातील त्याच्या सावरकरांच्या भूमिकेने तो सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. २२ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, रणदीपने या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक भीतीदायक गोष्ट शेअर केली आहे. या चित्रपटाचा काही भाग अंदमान आणि निकोबार बेटांमधील वसाहतकालीन सेल्युलर जेलमध्ये शूट करण्यात आला होता. यावेळचा चित्रपटाच्या सेटवरील एक भयानक अनुभव रणदीपने सांगितला आहे.
या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने रणदीप सर्वत्र मुलाखती देत आहे. अशातच नुकतीच त्याने रणवीर अलाहाबादियाच्या मुलाखतीच्या कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. या मुलाखतीत रणदीपने चित्रपटाविषयी व चित्रपटातील त्याच्या भूमिकेविषयी संवाद साधला. यावेळी रणदीपला “तुम्हाला सेटवर कधी सावरकरांचा भास झाला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. याचे उत्तर देत रणदीपने असं म्हटलं आहे की, “हो, कधीकधी तर मला सावरकरच दिग्दर्शक असल्यासारखे वाटू लागले होते. कारण, कॅमेऱ्याच्या प्रत्येक फ्रेममध्ये मला ते दिसत होते. कधी कधी काम करताना मला स्वतःचीच सावली दिसायची आणि तेव्हा प्रत्येकवेळी मला असं वाटायचं की, वा हे तर खरच विनायक दामोदरसारखे दिसत आहेत”.
यापुढे रणदीपने सेल्युलर जेलमधील शूटिंगचा अनुभव सांगताना असे म्हटले की, “तिथे चित्रीकरणाची परवानगी मिळणे हे ‘कठीण काम’ होते आणि त्या लोकेशनशिवाय चित्रपट बनलाच नसता. मला सावरकरांच्या खोलीत एकट्याला वेळ घालवायचा होता. म्हणून मी त्या खोलीत स्वत:ला बंद केले. मी थोडा वेळ ठीक होतो, पण नंतर मला वाटले की, भिंती माझ्यावर पडत आहेत. मी मदतीसाठी आरडाओरडा करू लागलो. पण माझा आवाज पोहोचलाच नाही. मी क्लॉस्ट्रोफोबिक झालो आणि मला श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागला”.
दरम्यान, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटाने आतापर्यंत समाधानकारक कामगिरी केली आहे. या चित्रपटात सावरकरांचा जीवनप्रवास दाखविण्यात आला आहे. या चित्रपटासाठीसाठी रणदीप हुड्डाने खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र त्याचे कौतुक होते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन, लेखन याचबरोबर निर्मितीदेखील रणदीपने केले आहे. हिंदीसह मराठी भाषेतही या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.