हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यानिमित्ताने शिव मंदिरात मोठी सजावट, रोषणाई केली जाते. अनेकजण घरी किंवा मंदिरात रुद्राभिषेक वा शिव उपासना करतात. या दिवशी भगवान शिव व माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीची सर्व संकटे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते, अशी मान्यता आहे. यंदा ८ मार्च २०२४ रोजी देशभरात महाशिवरात्रीचा पवित्र सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळणार आहे. (Mahashivratri 2024)
महाशिवरात्रीच्या दिवशी पूजेच्या वेळी परिधान केलेल्या कपड्यांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत? कोणत्या रंगाचे कपडे टाळावेत? कपडे कसे असावेत? या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. भोपाळचे रहिवासी ज्योतिषी आणि वास्तू सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी महाशिवरात्रीच्या रंगांचे महत्त्व सांगितले आहे.
महाशिवरात्रीच्या पवित्र सणाला पूजा करण्यासाठी कोणत्या रंगाचे कपडे घालावेत. भगवान शंकराला हिरवा रंग खूप आवडतो. त्यामुळे यादिवशी शक्यतो हिरवा रंग परिधान करावा. जर तुम्ही या दिवशी हिरवे कपडे परिधान केले तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. याशिवाय महाशिवरात्रीच्या पूजेदरम्यान तुम्ही लाल, पिवळे, गुलाबी, केशरी वा पांढऱ्या रंगाचे कपडेही परिधान करु शकता. या रंगाचे कपडे परिधान करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरु शकतं.
महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा करताना भगवान शंकरासमोर काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. याशिवाय या दिवशी निळ्या रंगाचे कपडे घालण्यास मनाई आहे. या रंगाचे कपडे नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात, जे तुमच्या पूजेमध्ये अडथळा आणू शकतात. केवळ महाशिवरात्रीच्या दिवशीच नव्हे तर कोणत्याही धार्मिक विधी किंवा पूजेच्या वेळी भारतीय संस्कृतीनुसार हिंदू धर्मात पुरुषांनी धोतर-कुर्ता आणि महिलांनी साडी नेसली पाहिजे. तुमचा ड्रेस सुती कापडाचा असावा याची विशेष काळजी घ्यावी.