महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार अभिनेते अशोक सराफ यांना काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. यावेळी महाराष्ट्राचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यानंतर लगेचच अशोक सराफ यांच्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. (Ashok saraf Sangeet Natya Academy Award)
शास्त्रीय संगीत, नृत्य, नाटक अशा विविध कलाक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या देशभरातील कलाकारांना दरवर्षी संगीत नाटक अकादमी प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. २०२२-२३ वर्षासाठीचे संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी अशोक सराफ यांची निवड करण्यात आली. नुकताच संगीत नाटक अकादमी पुरस्कार वितरण सोहळा अगदी दिमाखात पार पडला. यावेळी अशोक सराफ यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफही त्यांच्यासह तिथे उपस्थित होत्या.
नाट्य क्षेत्रातील कामगिरीसाठी अशोक सराफ यांना २०२२ या वर्षासाठीचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार स्वीकारतानाचा एक व्हिडीओ निवेदिता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी, “अशोक यांना हा पुरस्कार स्वीकारताना पाहून खूप खूप अभिमान वाटला. आम्ही दोघेही महाराष्ट्राच्या जनतेचे ऋणी आहोत”, असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे.
संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा महाराष्ट्रातील देवकी पंडित नंबियार यांना शास्त्रीय गायिका म्हणून देण्यात आला आहे. याशिवाय ढोलकी वाद्य म्हणून विजय चव्हाण यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर अशोक सराफ यांना मराठी नाट्य सृष्टीतील उत्तम कामगिरीबाबत हा पुरस्कार देण्यात आला आहे. या तीनही पुरस्कार मानकारांचा एकत्र एक फोटो शेअर निवेदिता यांनी, “खूप अभिनानाची गोष्ट आहे. आपले तीन मुंबईकर ज्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. देवकी पंडित शास्त्रीय संगीत – गायन, अशोक सराफ अभिनय – मराठी नाटक, विजय चव्हाण वाद्य – ढोलकी”, असं म्हटलं आहे.