‘मल्टिटॅलेंटेडपणा’ हा स्त्रियांमध्ये जन्मजात असलेला गुण. एकावेळी अनेक भूमिका साकारत प्रत्येक क्षेत्रात आपली मुशाफिरी करणे हे स्त्रीला अगदीच सहज जमते किंबहून ती ते सहज जमवून घेते. मग ते क्षेत्र कोणतंही असो. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात काम करत असतानादेखील आपल्या घराची व कुटुंबाची जबाबदारी अगदी समर्थपणे पेलतात. मराठी मनोरंजन सृष्टीतही अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या अभिनयाबरोबरच इतर अनेक क्षेत्रात महत्त्वाच्या भूमिका साकारतात.
उद्या ८ मार्च, जागतिक महिला दिन. ‘महिला दिना’च्या खास दिवशी अभिनयासह इतर अनेक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्रीच्या संघर्षाबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडीत. मराठीतील एक सुंदर व उत्तम अभिनेत्री म्हणून तेजस्विनी पंडित हे नाव अग्रगण्य आहे. अभिनेत्रीने अभिनयासह निर्मिती व उद्योग क्षेत्रातही आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे.
तेजस्विनी पंडीतची आई ज्योती पंडीत या प्रसिद्ध अभिनेत्री असूनही तेजस्विनीच्या वाटेला मोठा संघर्ष आला. आपल्या या संघर्षाबद्दल अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते, यावेळी अभिनेत्री असं म्हणाली की, “आई माझी उत्तम अभिनेत्री होती. नाटकासाठी तिला तेव्हा ६०० ते ७०० रुपये मिळत होते. एक वेळ अशी आली की, आमच्या घरामध्ये फक्त एक रुपयाच होता. खायलाही काही नव्हतं. फक्त घरामध्ये पीठी साखर आणि मैदा होता. तेव्हा स्टोव्हवर मैद्याचे बिस्किट्स करुन आम्ही खाल्ले. ती रात्र तशीच घालवली.”
यापुढे तिने असं म्हटलं की, “एकेकाळी आम्ही खूप कर्जबाजारी झालो. कर्ज फेडण्यासाठी पैसेही नव्हते. घरातली लाईटही कापली. जवळपास अडीच महिने अंधारात राहिलो. त्या क्षणाला मला असं वाटलं की, आता आपण थांबायचं नाही. पुण्यामध्ये एक प्रसिद्ध नाइट वेअर कंपनी आहे त्याची मी जाहिरात केली. त्याचे माझ्याकडे चांगले पैसे आले. तेव्हा सगळ्यात आधी जाऊन मी लाईट बिल भरलं. जेव्हा अडीच महिन्यानंतर घरामध्ये लाईट आली तो क्षण मी शब्दांमध्ये सांगू शकत नाही.
“त्यामुळे एका अभिनेत्रीच्या घरात लाईट नसते तेव्हा माणसं कशा नजरेने तुमच्याकडे बघतात, तुमच्या परिस्थितीकडे कशाप्रकारे बघतात? हेही मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. कारण हे आम्ही अनुभवलं आहे” असं म्हटलं. दरम्यान या सर्व परिस्थितीवर तेजस्विनीने मात करुन मनोरंजन विश्वात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे.