सिनेसृष्टीत काम करत असताना बऱ्याच कलाकारांना बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. बरेचदा हे कलाकार नेटकऱ्यांच्या कचाट्यात सापडतात तर कित्येकदा ही कलाकार मंडळी नेटकऱ्यांच्या या ट्रोलिंगला सडेतोड उत्तर देतात. तर कित्येक कलाकार बॉडीशेमिंगला धरून भाष्य करताना दिसतात. तर काही कलाकार असे आहेत ज्यांना त्यांच्या जाडेपणामुळे कित्येक भूमिका गमवाव्या लागल्या आहेत. याबाबत अभिनेत्री विशाखा सुभेदारने स्पष्टपणे भाष्य केलं आहे. (Vishakha Subhedar On obesity)
जाडेपणावर भाष्य करणाऱ्या बऱ्याच अभिनेत्री आहेत. कित्येकदा भूमिका गेल्याने त्या व्यक्त होतात, वा नेटकऱ्यांनी ट्रोल केलं तर त्यावर उत्तर देतात. अभिनेत्री विशाखा सुभेदार ही देखील स्पष्टपणे भाष्य करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सोशल मीडियावरही या अभिनेत्रीचा वावर बऱ्यापैकी मोठा आहे. सोशल मीडियावरून नेहमीच ती काही ना काही पोस्ट शेअर करत असते. आजवर विशाखाने तिच्या विनोदी भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
विशाखा सुभेदारने ‘इट्स मज्जा’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये जाडेपणामुळे भूमिका हातून गेली असल्याची खंत बोलून दाखवली. शिवाय तिचं हे अपयश असल्याचंही म्हणणं आहे. ती म्हणाली, “जाडेपणामुळे माझ्या हातून अनेक भूमिका गेल्या. पण बाळ आहे, लग्न झालं म्हणून भूमिका मिळाल्या नाहीत असं झालं नाही. कलाकार म्हणून भूमिका हातून गेल्या की खंत वाटते. आपल्याला करता आलं असतं पण आपण त्या फिगरच्या नाही आहोत म्हणून गप्प बसा असं बऱ्याचदा होतं. एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल तर कलाकारालाही त्यासाठी प्रयत्न करावे लागता. सई, अमृता या आताच्या मुलींचं मला यासाठी कौतुक वाटतं. कारण त्या त्या पद्धतीने या अभिनेत्री स्वतःवर काम करतात. कधी बारीक होतात तर कधी वजन वाढवतात.”
“प्रिया बापट ही यासाठी उत्तम उदाहरण आहे. स्वतःच्या शरीरावर सतत काम करत राहणं हे काही सोपं नव्हे. मला असं काही जमत नाही ते माझ अपयश आहे. याची मला खंत वाटते. पण माझ्या पद्धतीच्या भूमिका त्याही करु शकत नाही. त्यामुळे माझ्या प्रकारच्या भूमिका फक्त मीच करु शकते ही मी स्वतःला समजूत घालून ठेवली आहे”.