छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरांत पोहोचलेली विनोदी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या विशाखा समाजभानही जपतात, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. याबद्दलची एक पोस्ट विशाखा यांनी त्यांच्या सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका महिलेबरोबरचा खास फोटो शेअर करत तिच्याबद्दलची एक कौतुकास्पद पोस्ट लिहिली आहे.
विशाखा सुभेदार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत असं म्हटलं आहे की, “आज सकाळी माझे अंबरनाथचे घर सांभाळणारी माझी अन्नपूर्णा शोभाचा फोन आला. ती फोनवरून ताई खुशखबर आहे असं म्हणाली. (मला वाटलं मुलाच्या लग्नाची तारीख काढली असावी!) तिचा फोन येताच मी म्हटलं “काय गं??” तर ती म्हणली “ताई. २ बीएचकेचं घर घेतलं आहे.” ही बातमी ती अगदी खुप आनंदाने व उत्साहात सांगत होती. मलाही खुप आनंद झाला.
यापुढे विशाखा यांनी असं म्हटलं आहे की, “अंबरनाथ पश्चिमेला थोडं स्लम परिसरात राहणारी, चौदा वर्षांपूर्वी शोभा माझ्याकडे रोज ४० मिनिटे चालत कामाला यायची. तिची धावपळ व पोरांची काळजी म्हणून तिला माझ्या घराजवळ मी भाडयाने घर घेऊन दिलं होतं. तर वाचलेल्या वेळेत तिने अजून एक ठिकाणी काम धरलं, पोरं मोठी झाली आणि मग त्यांचं शिक्षणही झालं”.
यापुढे त्यांनी या पोस्टमध्ये असं लिहिलं आहे की, “तिचा हा प्रवास पहिला की, मलाच खुप समाधान मिळतं. तिच्या सगळ्या प्रवासाची मी साथीदार व साक्षीदार आहे. माझ्याकडे, माझ्याबरोबर काम करणाऱ्या माणसांची प्रगती झाली की मला खूपच कौतुक वाटतं. मग ती हेअर ड्रेसर असो किंवा स्पॉटबॉय असो किंवा ड्राइव्हर. परमेश्वरानं एक खारीचा वाटा त्यांच्या यशात मला उचलायला सांगितला, माझ्या कडून ते करवून घेतलं हे त्या ईश्वराचे आभार आणि शोभाचे खुप कौतुक”. दरम्यान, विशाखा यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी विषाखा सुभेदार यांचे कौतुकही केले आहे.