लग्न म्हटलं की मंगळसूत्र हे आलं. मंगळसूत्र हा स्त्रियांच्या सौभाग्याचा एक अलंकार आहे. सध्या मराठी सिनेसृष्टीत लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. अशातच बरीच कलाकार मंडळी विवाहबंधनात अडकलेली पाहायला मिळत आहेत. या कलाकार मंडळींच्या लूकची, दागिन्यांची, पोषाखांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. काहींचा यावेळी मॉडर्न अंदाज तर काहींचा पारंपरिक लूक पाहणं खूप खास ठरलं. तर काही अभिनेत्रींच्या मंगळसूत्राची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. अशातच एका मराठमोळ्या अभिनेत्रीच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. (Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding)
सिनेसृष्टीतील कलरफुल अभिनेत्री पूजा सावंत नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. पूजाने सिद्धेश चव्हाणसह लग्नगाठ बांधली आहे. शाही विवाहसोहळा करत पूजा सावंतने अखेर लग्न उरकलं आहे. बॉलिवूड स्टाईलने पूजाचं लग्न झालं असलं तरी मराठमोळी परंपरा जपत त्यांनी पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा उरकला. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय व कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीत पूजाचा लग्नसोहळा पार पडला आहे. पूजाच्या लग्नातील खास फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
पूजा सावंतच्या लग्नाच्या लूकमधील आकर्षणाची बाब म्हणजे मंगळसूत्र. पूजाच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या साध्या व सुंदर अशा डिझाइनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये काळे मणी व दोन डवल्या आहेत. पारंपरिक मंगळसूत्राला खास मॉर्डन टच देण्यात आला आहे. अभिनेत्रीने परंपरेनुसार माहेर व सासरकडची अशी दोन मंगळसूत्र घातली आहेत. नव्या नवरीचं हे खास मंगळसूत्र साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
लग्नासाठी पूजा व सिद्धेशने खास मराठमोळा लूक केला होता. पूजाने गुलाबी काठ असलेली व सोनेरी नक्षीकाम केलेली पिवळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तर सिद्धेशने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तसेच त्याने नक्षीदार शाल घेतली होती आणि फेटाही घातला होता. लग्नातील दोघांच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.