हिंदी सिनेसृष्टीत ‘संस्कारी बाबूजी’ म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते म्हणजे आलोक नाथ. आलोक नाथ सध्या सिनेविश्वापासून लांब आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘MeToo’ मोहिमेदरम्यान त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर त्याला काम मिळणे बंद झाले आणि मग पुन्हा ते कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकांमध्ये दिसले नाहीत. आलोक नाथ हे शेवटचे ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात दिसले होते आणि हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला होता.
‘MeToo’ दरम्यान त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. मात्र आता त्या प्रकरणावर अभिनेत्री नारायणी शास्त्रीने आलोकनाथ यांच्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेत्रीने नुकतीच सिद्धार्थ कननला मुलाखत दिली. या मुलाखतीत नारायणी शास्त्रीने आलोक नाथ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभवही सांगितला. तसेच तिने आलोकनाथ यांना तिचा आवडता सहकलाकार असल्याचेही म्हटलं आहे.
आलोकनाथ यांच्याबरोबर काम करण्याबाबत नारायणीने असं म्हटलं की, “मला आलोकनाथ खूप आवडतात. त्याच्यावर झालेल्या आरोपांमुळे मी दुखावले गेले. ते माझे खूप आवडते सहकलाकार होते आणि त्यांच्याबरोबर काम करण्याचा माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की, आमच्या युनिटमध्ये एकूण ५ मुली होत्या. ते आमचा खूप आदर करायचे. आलोक जींच्या घरी आम्ही एकत्र खूप पार्ट्या करायचो. ते जरा जास्तच दारू प्यायचे. परंतु त्यांनी कधीही गैरवर्तन केले नाही. त्याच्या आयुष्यात अजून जे काही घडले, त्यावर मी भाष्य करू नये असे मला वाटतं.”
यापुढे अभिनेत्रीने असं म्हटलं की, “ते अतिशय सज्जन होते. त्यांनी मला मुलींसारखे वागवले. त्याच्यावर आरोप झाल्यावर मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. हो, पण काही दिवसांपूर्वी मी त्याच्याशी बोलले. खूप दिवसांनी आमच्यात संभाषण झाल्यामुळे त्यांना धक्का बसला होता. तो थोडासा मनाने दुखावले आहेत. ते माझ्यासाठी चांगले होते, चांगले आहेत आणि नेहमी चांगलेच राहतील”.